Join us  

गुढीपाडवा मेळाव्यासाठी मनसेची जय्यत तयारी सुरू; राज ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष

By मनोहर कुंभेजकर | Published: April 07, 2024 3:26 PM

खुद्द राज ठाकरेंची सभा असल्याने कार्यकर्तेदेखील कामाला लागले आहेत

मनोहर कुंभेजकर, मुंबई: नवं वर्षाच्या दिनी म्हणजेच गुढी पाडव्याच्या दिवशी दादर येथील छत्रपती शिवाजी पार्क मैदानात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा होणार असल्याने सभेचे मंडप उभारण्यापासून जय्यत तयारी करण्यात आली आहे. राज ठाकरे यांची सभा होणार असल्याने कार्यकर्ते देखील कामाला लागले असून प्रत्येकाला सभेची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.

सभा स्थळी पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला असून पिण्याचे पाण्याचे टँकर, फायर मशीन, फिरते शौचालय, कार्डीयाक ऍम्ब्युलन्स, व्हॅनिटी व्हॅन पार्किंग व्यवस्था करण्यात आल्याचे मनसेचे माहीम विधानसभा विभागअध्यक्ष यशवंत किल्लेदार यांनी लोकमतला ही माहिती दिली.त्याचप्रमाणे आरोग्याच्या दृष्टिकोनातून हिंदुजा व सुश्रुषा रुग्णालयात काही बेड आरक्षित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

सभा स्थळी पोहचताना तसेच पोहचल्यावर नागरिकांना कोणतीही अडचण उदभवू नये याकरिता वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मनसेचे 100 सुरक्षारक्षक, 500 स्वयंसेवक व 100 वोर्डन नेमण्यात आले असून सर्व ड्रॉप पॉईंट वरून सभा स्थळी पोहचण्यासाठी 50 बीएसटी शटलची व्यवस्था करण्यात आली आहे.

गुढी पाडवा मेळाव्याकरिता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता असल्याने त्या दृष्टिकोनातून वाहतूक कोंडी होऊ नये गैरसोय होऊ नये याकरिता उपाययोजना करण्याचे निर्देश पोलीस उप आयुक्ताकडून देण्यात आले आहेत. निवडणुकाच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे काय संबोधणार, कोणते सुतोवाच करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे त्यामुळे यंदा रेकॉर्ड ब्रेक गर्दी होणार आणि त्यासाठी मनसेने योग्य अशी खबरदारी घेतली असल्याचे किल्लेदार यांनी सांगितले.

टॅग्स :राज ठाकरेगुढीपाडवा