Join us

खोलीत झोपलेल्या बाळासाहेबांना राज ठाकरेंनी दिला होता भाजपाचा निरोप, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 8:27 PM

सव्वा तीन वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर, सभागृहात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट हे लागतेय त्याबद्दल मी नार्वेकरांचे अभिनंदन करतो असं राज ठाकरे म्हणाले.

मुंबई - महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच असेल दुसरा कुणी असणार नाही असं सांगून बाळासाहेब पुन्हा झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी कळालं अशा शब्दात १९९९ मध्ये घडलेला किस्सा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सांगितला. विधानभवनाच्या मध्यवर्ती सभागृहात बाळासाहेब ठाकरे यांच्या तैलचित्राचं अनावरण करण्यात आले. या सोहळ्यात उपस्थित असलेले राज ठाकरे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. 

राज ठाकरे म्हणाले की, १९९९ ची निवडणूक झाली. गोपीनाथ मुंडे होते. काही कारणास्तव मुख्यमंत्रिपदावरून शिवसेना-भाजपा युती सरकार अडलं होतं. स्वाक्षरी होत नव्हती. दुपारची ३.३० ची वेळ होती. मातोश्रीवर २ गाड्या लागल्या. त्यातून प्रकाश जावडेकर आणि २-३ भाजपा नेते बाहेर आले. आम्ही बाळासाहेबांना भेटण्यासाठी आलो आहोत असं त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं साहेब झोपलेत. उठल्यावर भेटा, मात्र अर्जंट आहे. त्यावर बाळासाहेब भेटणार नाहीत असं मी म्हटलं. तेव्हा आज आपलं सरकार बसतंय. सुरेश जैन युतीचे मुख्यमंत्री असतील हे ठरलं आहे बाळासाहेबांच्या कानावर हे घालायचं आहे असा निरोप त्यांनी दिला. 

त्यानंतर मी हा निरोप देण्यासाठी वरच्या रुममध्ये गेलो. काका झोपले होते. त्यांना दोन-तीनदा आवाज देऊन उठवले. निरोप दिला. सुरेश जैन यांना मुख्यमंत्री करायचंय आणि ते आमदार खेचून आणतील असा निरोप मी दिला. तेव्हा बाळासाहेब म्हणाले, त्यांना सांग महाराष्ट्राचा मुख्यमंत्री मराठीच बसेल दुसरा कुणी बसणार नाही. हे सांगून बाळासाहेब परत झोपले. मराठी माणसासाठी बाळासाहेबांनी सत्तेवर लाथ मारली हे त्याच क्षणी कळालं. मराठीसाठी, हिंदुत्वासाठी कडवटपणा बाळासाहेबांमध्ये होता असं राज ठाकरेंनी सांगितले. 

राज यांचा उद्धव ठाकरेंना टोलासव्वा तीन वर्षानंतर बाहेरच्या होर्डिंग्सवर, सभागृहात शिवसेनाप्रमुखबाळासाहेब ठाकरे यांच्या नावासमोर हिंदुह्दयसम्राट हे लागतेय त्याबद्दल मी नार्वेकरांचे अभिनंदन करतो. ज्या व्यक्तीमुळे तुम्हाला ही इमारत बघायला मिळाली त्या बाळासाहेब ठाकरेंचे तैलचित्र अनावरण इथं होतोय. विधानसभेत, विधान परिषदेत हे तैलचित्र असावीत. आपण कुणामुळे इथे आलो ते कळेल असं सांगत राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरेंना अप्रत्यक्षपणे टोला लगावला. 

मी विचारांचा वारसा जतन करतोय बाळासाहेब मला शाळेतून न्यायला यायचे. शिवसेनाप्रमुख, व्यंगचित्रकार, घरातला व्यक्ती अशा विविध अंगाने मी बाळासाहेबांना पाहत आलो. वारसा हा वास्तूचा नसतो तर विचारांचा असतो. माझ्याकडे जर काही आले असेल तर तो विचारांचा वारसा मी जतन करतोय. संस्कार कुणी करत नसते. कृती घडताने ते संस्कार वेचायचे असतात. ते संस्कार वेचत गेलो. मी अत्यंत कडवट मराठी आहे. हिंदुत्ववादी घरात माझा जन्म झालाय. हा कडवटपणा लहानपणापासून पाहायला मिळालं. बाळासाहेब बाहेर वेगळे आणि घरात वेगळे असं नव्हते असंही राज म्हणाले. 

बाळासाहेबांमुळेच राजकीय पक्ष काढू शकलोबाबरी पडली असा फोन आला होता. जर शिवसैनिकांनी बाबरी पाडली असेल तर मला अभिमान वाटतो असं एका क्षणी बाळासाहेबांनी म्हटलं. अशा प्रसंगात जबाबदारी अंगावर घेणे किती मोठे असते. हा माणूस कठोर होता, तितकाच मुलायम, साधा होता. त्यांचे विनोद काही वेळा सांगताही येणार नाहीत. विलक्षण व्यक्तिमत्व बाळासाहेब होते. लहानपणापासून मी बाळासाहेबांसोबत वावरल्यामुळे मी स्वत:चा राजकीय पक्ष काढू शकलो. ही हिंमत माझ्यात आली. यश पचवू शकलो, पराभवाने खचलो नाही. बाळासाहेबांचे तैलचित्र विधानभवनात लागतेय. ज्या इमारतीत बाळासाहेबांनी इतके शिलेदार पाठवले. त्याबद्दल विधानसभा अध्यक्ष, मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्री यांचे आभार मानतो असंही राज ठाकरेंनी भाषणात म्हटलं.  

टॅग्स :राज ठाकरेबाळासाहेब ठाकरेशिवसेना