Raj Thackeray : विधानसभा निवडणुकीची घोषणा होताच राज्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करताना दिसत आहेत. महायुती सरकारच्या योजनांवरुन महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं आहे. महायुतीच्या नेत्यांकडूनही विरोधकांना जोरदार प्रत्युत्तर दिलं जातंय. आता यामध्ये महाराष्ट्र नवनिर्मान सेनेनेही सरकारी योजनांवर भाष्य करण्यास सुरुवात केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत बोलताना यामुळे राज्य कंगाल होईल असं म्हटलं आहे.
यंदाची विधानसभा निवडणूक मनसे स्वबळावर लढणार आहे. निवडणुका लढवून जिंकण्याचा आणि सरकार बनवण्याचा निर्धार असल्याचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटलं आहे. मुंबईत झालेल्या बैठकीत महायुतीला पाठिंबा, टोलमाफी आणि सरकारच्या महत्वाकांक्षी लाडकी बहीण योजनेबाबत राज ठाकरे यांनी भाष्य केलं. टोलमाफी करण्याची मागणी आमचीच होती. तसेच असे फुकट पैसे वाटणं योग्य नसल्याचे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
"मी मागे माझ्या सभेत बोललो होतो अशाप्रकारे लोकांना मोफत पैसे वाटणं योग्य नाही. तुम्ही ५ हजार, ७ हजार वाटत आहात. सरकार असं करू शकत नाही. ते तुमच्या घरचे पैसे आहेत का? हे सरकारचे पैसे आहेत. सरकारकडे तिजोरीत पैसे नाही. लाडकी बहीण योजनेचा आता जो हफ्ता मिळाला आहे, तो शेवटचा हफ्ता असेल. यापुढे सरकार पैसे वाटू शकत नाही. कारण सरकारकडे पैसेच नाही. आता ते असे पैसे वाटू शकत नाहीत. राज्य कंगाल होईल," असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.
पुन्हा हे टोल सुरु होऊ देणार नाही - राज ठाकरे
"टोलमाफी करा ही आमचीच मागणी होती. त्यासाठी आमच्या महाराष्ट्र सैनिकांनी प्रयत्न केले. अनेक आंदोलनं केली . अनेकांनी टोलनाके बंद करतोय असा शब्द दिला, पण नंतर पैसे पूर्ण वसूल न झाल्याने सुरु करावे लागतील असे प्रकार झाले आहेत. जर असा निर्णय झाला असेल तर लोकांनाही समाधान आहे. अखेर किती पैसे येतात आणि कुठे जातात हे कळण्याचा मार्ग नाही. आजपर्यंत झालेला व्यवहार सगळा रोख होता. ते कोणाकडे गेले, कोणाला किती मिळाले, कोणच्या खिशात किती जमा झाले यावर सगळेच गप्प होते. आता श्रेय घेण्यासाठी अनेकजण पुढे येतील. पण जगाला हे आंदोलन कोणी केलं हे माहिती आहे," असंही राज ठाकरे म्हणाले.