मुंबई - सत्ताधारी भाजपाच्या विरोधकांची मोट बांधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हालचाली सुरू केल्या असतानाच, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी (17 मार्च) सकाळी पवारांच्या पेडर रोडवरील निवासस्थानी पोहोचल्यानं अनेकांच्या भुवया उंचावल्यात. मनसेच्या उद्याच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे आपल्या 'इंजिना'ची पुढची दिशा सांगणार आहेत. या पार्श्वभूमीवरच, ते पवारांच्या भेटीला गेल्यानं तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
चर्चांना पूर्णविराम
मात्र, ''शरद पवारांच्या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झालेली नाही. त्यांच्या मुलाखतीनंतर भेट झालेली नव्हती, त्यामुळे ही केवळ सदिच्छा भेट होती'', अशी माहिती राज ठाकरे यांनी दिली. मात्र, सदिच्छा भेट असल्याचं सांगत राज ठाकरेंनी चर्चांना पूर्णविराम देण्याचा प्रयत्न केला आहे.
काय बोलणार राज ठाकरे?
गुढी पाडव्यानिमित्त राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर जाहीर सभेचं आयोजन केले आहे. या सभेतून राज ठाकरे राज्यभरातील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. शिवाय, पक्षाची भविष्यातील वाटचालही मांडणार आहेत. त्यामुळे उद्याच्या सभेमध्ये राज ठाकरे पवारांसोबत झालेल्या भेटीमध्ये नेमकी काय चर्चा झाली? हे सांगणार का? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दरम्यान, गेली 12 वर्षं मराठी माणूस, भूमिपुत्र, मराठी भाषा हे प्रमुख मुद्दे घेऊन लढणाऱ्या आणि 'खळ्ळ-खटॅक'साठी ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पुढचा अजेंडा काय असेल, त्यांचं 'इंजिन' कुठल्या दिशेनं पुढे जाईल, हे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार आहेत.
राज ठाकरे पाडव्याच्या मुहूर्तावर जाहीर करणार 'इंजिना'ची पुढची दिशा
मनसेच्या स्थापनेला शुक्रवारी (9 मार्च) 12 वर्षं पूर्ण झाली. यावेळी सोहळ्यादरम्यान बोलताना राज ठाकरे यांनी सांगितले की, 18 तारखेला, गुढीपाडव्याच्या दिवशी शिवाजी पार्कवर होणाऱ्या सभेत मी माझं म्हणणं मांडेन, असं राज यांनी स्पष्ट केलं. 18 मार्चला मी बोलणार असल्याने बाजारातून मेणबत्त्या आणून ठेवा. अनेक ठिकाणी माझ्या सभेच्या वेळी वीज घालवण्याचे धंदे सुरू होतात. पण, यावेळी दिवे घालवणाऱ्या अधिकाऱ्यांशी आधी बोलून ठेवा. सभा सुरू असताना अशा काही गोष्टी केल्या तर त्यांना तुडवा. कारण, इतर पक्षांच्या दबावाला बळी पडून वीज घालवणार असतील तर त्यांना हिसका दाखवणं गरजेचं आहे, असे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले होते.