अहवाल द्यायचा म्हणजे काय...?; राज ठाकरेंनी दिला आदेश अन् जोमात रंगली चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2022 10:12 AM2022-11-03T10:12:01+5:302022-11-03T10:12:29+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेतली.
कुजबुज
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत कार्यकर्त्यांची बैठक घेतली. वर्षभरात तुम्ही काय कार्यक्रम करणार आहात? कशा पद्धतीने कार्यक्रमांचे नियोजन असेल? याचा अहवाल तातडीने द्या, अशा सूचना केल्या. कार्यकर्ते आता बुचकळ्यात पडले आहेत. अहवाल द्यायचा म्हणजे काय करायचं त्यासाठी कार्यक्रम ठरवावे लागतील. कार्यक्रम करायचे असतील तर त्यासाठी पैसे लागतील. पैसे कुठून आणायचे? कसे उभे करायचे? असे प्रश्नही त्यांच्यासमोर आहेत.
अहवाल कागदावर लिहिणं सोपं आहे. पण प्रत्यक्षात जे लिहिलं आहे त्यानुसार फिल्डवर काम करायचं, तर ते कशा रीतीने करायचं हा प्रश्न सध्या कार्यकर्त्यांना भेडसावत आहे. याआधी असा अहवाल कोणी दिला होता का? त्याचा शोध घेणे आता सुरू झाले आहे. म्हणजे त्याच पद्धतीचा अहवाल आपण देऊ आणि आपली सुटका करून घेऊ असे काहींना वाटत आहे... मात्र, येणारा अहवाल मी स्वतः वाचणार आहे. त्याबद्दल तपशीलवार माहिती विचारणार आहे, असेही राज यांनी वरिष्ठ नेत्यांकडे सांगितल्यामुळे सध्या पक्षात अहवालाचीच चर्चा जोमात आहे..!
आगे आगे देखो होता है क्या...!
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘’बाळासाहेबांची शिवसेना’’ या पक्षात बाळासाहेबांचे सुपुत्र जयदेव ठाकरे, नातू निहार ठाकरे, सून स्मिता ठाकरे हे एका व्यासपीठावर आल्याचे महाराष्ट्राने पाहिले. त्यानंतर एकनाथ शिंदे हे राज ठाकरे यांच्या घरी गणपती दर्शनाला गेले. राज ठाकरे देखील लगेच मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर गणपती दर्शन करून आले.
दिवाळीच्या तोंडावर शिवाजी पार्कच्या रोषणाईत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्र्यांना आमंत्रित केले. त्यांच्यामधील ही जवळीक वाढत चालण्याचे पाहून महापालिकेच्या तोंडावर राज ठाकरे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसोबत हातमिळवणी करणार, आणि जागा वाटपाचे गणित ठरवून घेणार, अशी जोरदार चर्चा आहे. याबद्दल दोन्ही पक्षांचे नेते स्पष्टपणे काही बोलत नसले, तरी ‘’आगे आगे देखो होता है क्या..’’ असं ते हसत हसत पत्रकारांना सांगतात. त्यांचे हास्य खूप काही सांगून जात आहे.