Join us

"आख्ख्या देशाने जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद निर्माण करणारा सचिन", राज ठाकरेंकडून खास शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2023 2:54 PM

Happy Birthday Sachin Tendulkar : महान क्रिकेटपटू सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले.

sachin tendulkar 50th birthday । मुंबई : भारताचा महान क्रिकेटपटू क्रिकेटचा देव, मास्टरब्लास्टर, जागतिक क्रिकेटला नवीन ओळख देणारा आणि भारतीयांचे दैवत अशा अनेक नावांनी ओळखल्या जाणाऱ्या सचिन रमेश तेंडुलकरने आज आयुष्याचे अर्धशतक पूर्ण केले. आपल्या सर्वांचा लाडका सचिन आज ५० वर्षांचा झाला. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून सचिनने निवृत्ती घेतली. या गोष्टीलाही आता दहा वर्ष होत आली. पण तरीही त्याने त्याची प्रतिमा आणि चाहतावर्ग अद्यापही तसाच राखण्यात यश मिळवले आहे. निवृत्तीनंतर त्याचा चाहतावर्ग कमी झालेला नाहीच, उलट सचिनच्या नवनव्या गोष्टींमुळे त्याच्या चाहत्यांमध्ये भरच पडताना दिसते. क्रिकेटमध्ये ४०व्या वर्षी निवृत्त होणाऱ्या सचिनने २४ वर्षे क्रिकेट खेळले आणि समृद्ध अशी कारकीर्द घडवली. सचिनचे रेकॉर्ड पाहिले की प्रत्येक भारतीय सचिनला साष्टांग दंडवत घालूनच त्याचे आभार मानू शकतो. विविध क्षेत्रातील दिग्गज मंडळी सचिन तेंडुलकरला त्याच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत आहेत. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील एक खास पोस्ट लिहून मास्टर ब्लास्टरला शुभेच्छा दिल्या आहेत.

राज यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले, "सचिन तेंडुलकरने आज अवघी पन्नाशी पूर्ण केली. ह्या अवाढव्य देशाच्या हृदयाचे ठोके एकाच क्षणाला थांबवायची किंवा एकत्र आख्ख्या देशाने ज्याच्यावर जीव ओवाळून टाकावा, अशी ताकद ज्या माणसाने निर्माण केली तो आपला सचिन. आकाशाला गवसणी घालणारं अफाट असं यश मिळवून देखील जमिनीला घट्ट पाय ठेवणाऱ्या माझ्या मित्राला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा. सचिनने शतक ठोकलंच पाहिजे अशी कायमच इच्छा किंवा अपेक्षा असते, ही इच्छा/अपेक्षा @sachin_rt तू पूर्ण करशीलच." 

दरम्यान, भारतीयांची शान असलेल्या सचिनवर काल रात्री बारा वाजल्यापासूनच शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन स्वत: आपला ५०वा वाढदिवस साजरा करण्यासाठी निसर्गाच्या सानिध्यात म्हणजेच कोकणात गेला आहे. सचिन आपल्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला सिंधुदुर्गात असून तो आपला वाढदिवस भोगवे येथील समुद्रकिनारी साजरा करत आहे. सचिन रविवारी दुपारी मित्रांसमवेत गोवा मार्गे सिंधुदुर्ग जिल्ह्यात दाखल झाला. तेथील भोगवे समुद्रकिनारी फेरफटका मारताना तो अनेकांना दिसला. भोगवे येथील समुद्रकिनारी असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये सचिन आपला ५०वा वाढदिवस साजरा करणार असल्याचे बोलले जात आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

 

टॅग्स :सचिन तेंडुलकरमनसेराज ठाकरेभारतीय क्रिकेट संघ