मनसेला अध्यक्षपदाची लॉटरी
By admin | Published: March 23, 2017 02:03 AM2017-03-23T02:03:31+5:302017-03-23T02:03:31+5:30
महापालिका निवडणुकीत मोठ्या यशानंतरही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने, प्रभाग समित्यांमध्ये मात्र सरशी केली आहे.
मुंबई : महापालिका निवडणुकीत मोठ्या यशानंतरही सत्तेपासून दूर राहिलेल्या भाजपाने, प्रभाग समित्यांमध्ये मात्र सरशी केली आहे. १७पैकी ९ प्रभाग समित्यांवर भाजपाचे वर्चस्व आहे, तर शिवसेनेकडे आतापर्यंत सहा प्रभाग समित्या आल्या असून, एका प्रभागाची निवडणूक उद्या होणार आहे. एल प्रभागात शिवसेनेच्या मदतीने मनसेला अध्यक्षपदाची लॉटरी लागली आहे.
२०१७च्या निवडणुकीत शिवसेना आणि भाजपाची ताकद वाढली असून, विरोधकांचे संख्याबळ जेमतेम ६० आहे. त्यात शिवसेना आणि भाजपामध्ये समझोता झाल्याने, विविध समिती अध्यक्षपदांच्या निवडणुका बिनविरोध करण्यात येत आहेत.
उभय पक्षांतील वाटाघाटीनुसार, पहिल्या वर्षी ८ प्रभाग शिवसेनेकडे, तर भाजपाला ९ प्रभागांचे अध्यक्षपद मिळणार आहे. यापैकी मंगळवारी ८ प्रभागांपैकी ५ भाजपाकडे, तर ३ शिवसेनेला मिळाले आहेत. उर्वरित ९पैकी ८ प्रभागांची निवडणूक बुधवारी पार पडली. यामध्ये भाजपाला ४ तर शिवसेनेला ३ प्रभाग समित्यांचे अध्यक्षपद मिळाले. शिवसेनेच्या वाट्याचा एल प्रभाग मनसेला भेट देण्यात आला, तर एम पूर्व प्रभाग समिती अध्यक्षपदाची निवडणूक गुरुवारी होणार आहे. तरीही या वेळेस प्रभाग समित्यांवर भाजपाचेच वर्चस्व असणार आहे. (प्रतिनिधी)