गांधी मार्केट येथील सायकल ट्रॅक विरोधात मनसेचे आंदोलन
By मनोहर कुंभेजकर | Published: October 7, 2022 05:05 PM2022-10-07T17:05:32+5:302022-10-07T17:07:08+5:30
चुकीच्या जागी सायकल ट्रॅक उभारून लोकांच्या पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा लोकांना काय हवे याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दिली.
मुंबई - सायन येथील गांधी मार्केट आणी त्या पदपथावर गर्दीच्या भागात सायकल ट्रॅक बनविला असल्याने आधीच त्याठिकाणी वाहतूक कोंडी होत असून त्यात सायकल ट्रॅकची भर पडल्याने अडथळ्यांमध्ये वाढ झाली आहे. तसेच या सायकल ट्रॅकचा उपयोग गर्दूले, अनधिकृत झोपड्या व कचरा वेचक करत असल्याने सर्व सामान्य नागरिक, दुकानदार व ग्राहकांची मात्र गैरसोय होते.
सायकल ट्रॅक विरोधात आज मनसेचे व्यापारी सेनेचे अध्यक्ष यशवंत किल्लेदार यांच्या नेतृत्वाखाली सायन गांधी मार्केट येथे आंदोलन करण्यात आले. येथील उभारण्यात आलेल्या सायकल ट्रॅक विरोधात नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर याची त्वरित दखल घेत मनसेच्या व्यापारी संघटनेने याला विरोध करत निषेध नोंदवीला.
यावेळी सायकल ट्रॅकच्या विळख्यातून सुटका करावी अशी मागणी मनसेने केली आहे. या संदर्भात पालिकेच्या परिमंडळ २ च्या उपायुक्तांना निवेदन देण्यात आले.पार्किंग क्षेत्रात सायकल ट्रॅकचे काम सुरु झाल्याने गाडी कुठे उभी करायची असा प्रश्न दुकानदारांना पडलं आहे तर पार्किंग अभावी ग्राहक देखील मार्केटला येण्याचे टाळत असल्याचे किल्लेदार यांनी निवेदनात म्हंटले आहे.
ज्या जागी पूर्वी पार्किंगची जागा होती त्या ठिकाणी आता सयकल ट्रॅक उभारण्यात आला आहे. चुकीच्या जागी सायकल ट्रॅक उभारून लोकांच्या पैशांचा अपव्यय करण्यापेक्षा लोकांना काय हवे याचा विचार करायला हवा अशी प्रतिक्रिया व्यापाऱ्यांसह नागरिकांनी दिली.
युरोपातला प्रकल्प येथे राबविण्यापूर्वी भारत आणी युरोप यांच्यातला इन्फ्रास्ट्रकचर, इथली लोकसंख्या , मानसिकता ट्रॅफिक समस्या याबाबी तपसायलायला हव्यात. स्वतःच स्वप्नं पूर्ण करणं आणि आम्ही करुन दाखवलं या पेक्षा लोकांच्या गरजांना प्राध्यान्य द्यायला पाहिजे. याआधीही एल्फिन्स्टन, दादर सेनापती बापट मार्ग व पवई याठिकाणी बांधण्यात आलेले सायकल ट्रॅक फोल ठरले उलट याठिकाणी अतिक्रमण वाढले असे किल्लेदार यांनी सांगितले.
सायकल ट्रॅक तयार करण्यासाठी पदपथावर सुशोभीकरण करण्यात आले आहे त्यासाठी ठेवण्यात आलेल्या मोठ्या कुंड्यांचा वापर अतिक्रमण करण्यासाठी करत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. यासंदर्भात येत्या आठ दिवसात बैठक घेण्यात येणार असून बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला नाही तर हा सायकल ट्रॅक येथून हटविण्यात येईल असा ठोस इशारा मनसेने दिला आहे.
यशवंत किल्लेदार यांनी लोकमतला सांगितले की, मुळात मार्केट भागात किंवा गर्दीच्या ठिकाणी सायकलं ट्रॅक नसतोच, मात्र आम्ही काहीतरी करून दाखविले आहे यासाठी हा सायकल ट्रॅक नागरिकांच्या माथी मारला आहे.