Join us

‘फोर्स २’च्या चित्रीकरणात मनसेचा राडा

By admin | Published: April 23, 2016 3:40 AM

पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू असलेल्या ‘फोर्स २’ चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने बंद पाडल्याची घटना शुक्रवारी घडली

मुंबई : पश्चिम उपनगरातील गोरेगाव येथील ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये सुरू असलेल्या ‘फोर्स २’ चित्रपटाचे चित्रीकरण महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेने बंद पाडल्याची घटना शुक्रवारी घडली. कामाचा परवाना नसताना काही परदेशी कलाकार चित्रपटात काम करीत असल्याचे कारण पुढे करीत कार्यकर्त्यांनी चित्रीकरण थांबवले. तक्रारीनंतर पोलिसांनी ३५ परदेशी कलाकारांना ताब्यात घेतले आहे.येथील ठाकूर पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये बॉलीवूड अभिनेता जॉन अब्राहमची भूमिका असणाऱ्या ‘फोर्स २’ या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू होते, त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट सेनेचे उपाध्यक्ष संदीप सावंत यांच्या नेतृत्वाखाली येथे आंदोलन छेडण्यात आले. आंदोलनादरम्यान चित्रपटात काम करणाऱ्या परदेशी कलाकारांकडे कामाचा परवाना नसल्याचा मुद्दा आंदोलनकर्त्यांनी मांडला. शिवाय चित्रपटाचे चित्रीकरण बंद पाडले. घटनेनंतर आंदोलनकर्त्यांनी ही माहिती स्थानिक पोलीस ठाण्यात जाऊन दिली. तक्रारीनंतर पोलिसांनी ३५ परदेशी कलाकारांना ताब्यात घेतले आहे. संबंधित देशांच्या दूतावासांशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येईल, असे पोलिसांनी म्हटले आहे. दरम्यान, विपुल शाह हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. त्यामुळे विनापरवाना चित्रपटात परदेशी कलाकारांना सहभागी करून घेतल्याबद्दल त्यांच्यावर पोलीस काय कारवाई करणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)