मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने लढवावी, असा कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. मात्र, पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे ईव्हीएम विरोधात असल्यामुळे निवडणूक लढणार की नाही, याबाबत अद्याप संभ्रम आहे. पण, सुत्रांनी दिलेल्या मागितीनुसार, मनसे जवळपास 100 जागांवर निवडणूक लढणार असल्याचे समजते.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या विभाग प्रमुखांची मते जाणून घेण्यात आली. यासाठी विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडून अहवाल मागविण्यात आला आहे, या अहवालात मनसेच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक लढवावी, असा आग्रह केला असल्याचे मनसे नेते बाळा नादंगावकर यांनी सांगितले. ते आज पत्रकारांशी बोलत होते.
महाराष्ट्रातील ठाणे, पुणे, नाशिक मतदार संघातील नेत्यांशी चर्चा केली आहे. ही सकारात्मक चर्चा झाली आहे. विभाग अध्यक्ष, उपाध्यक्ष यांच्याकडून मागवण्यात आलेला अहवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे दिला जाणार आहे. त्यानंतर निवडणूक लढवायची की नाही, याबाबत निर्णय राज ठाकरेच घेतील, असे बाळा नादंगावकर म्हणाले.
याशिवाय, ईव्हीएमचा विषय आहेच. ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यास विरोध आहे. त्याबद्दल शाशंकता असल्यामुळे आधीपासून ही भूमिका घेतली आहे. राज ठाकरे यांचाही ईव्हीएमला विरोध आहे, त्यामुळे निवडणूक लढवायची की नाही, याबाबत सर्वस्वी निर्णय राज ठाकरेच घेतील, असे बाळा नादंगावकर सांगितले आहे.
दरम्यान, मागील मनसेच्या बैठकीत आगामी विधानसभा निवडणूक लढणार नसल्याचा सूर उमटला होता. त्यावेली स्वतःकडचे पैसे जपून वापरा, देशाची आर्थिक स्थिती यापुढे अत्यंत बिकट आहे, असा सल्ला राज ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिला होता, असे सांगण्यात येते. पण, या बैठकीत विधानसभेच्या काही जागा लढवण्याची भावना पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती.