मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लीलावती रुग्णालयात शस्त्रक्रियेसाठी दाखल करण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून राज ठाकरेंच्या पायाचं दुखणं बळावलं होते. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला होता. रविवारी राज ठाकरे वांद्रे येथील लीलावती रुग्णालयात दाखल झाले. त्यानंतर सोमवारी डॉक्टरांकडून राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली.
राज ठाकरे(Raj Thackeray) यांच्यावर हिप बोनची शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. १ जून रोजी राज यांच्यावर शस्त्रक्रिया होणार होती. परंतु त्यावेळी कोरोनाची लागण झाल्यामुळे राज यांच्यावरील शस्त्रक्रिया पुढे ढकलण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. अखेर ही शस्त्रक्रिया लीलावतीच्या डॉक्टरांनी सोमवारी २० जूनला पार पाडली. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहेत. संध्याकाळी ४ वाजता लीलावती रुग्णालयाकडून त्यांच्या तब्येतीची माहिती माध्यमांना देण्यात येणार आहे.
राज यांनी शस्त्रक्रियेमुळे आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेत या शस्त्रक्रियेसंदर्भात माहिती दिली होती. यानंतर आता ही हिप बोनची शस्त्रक्रिया पार पडली आहे. यासाठी ते रविवारी लीलावती रुग्णालयात दाखल झाले होते. राज ठाकरे यांच्या पायावर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांना साधारण दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे. काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कार्यक्रमात राज ठाकरे यांनी आपल्या शस्त्रक्रियेबद्दल माहिती दिली होती.
शस्त्रक्रियेबद्दल माहिती देताना राज ठाकरे म्हणाले होते की, "माझ्या हिप बोनची शस्त्रक्रिया आहे. हे जाहीरपणे सांगतोय कारण कुणालाही न सांगता शस्त्रक्रियेला गेलो, तर आमचे पत्रकार बांधव कुठला अवयव काढतात काही नेम नाही."जवळपास ३५ वर्षे माझे वजन 63 किलो इतकंच होते. पण त्यानंतर वजन आणि इतर गोष्टी वाढायला लागल्या. आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने घेतल्या पाहिजेत. मात्र, आपण आज करू, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे" असा सल्ला राज ठाकरेंनी दिला.