माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका

By अतुल कुलकर्णी | Published: November 13, 2024 05:13 AM2024-11-13T05:13:32+5:302024-11-13T05:18:01+5:30

मनसेने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली, त्यात अमितचे नाव होते. तुम्ही उमेदवार देणार आहात की नाही, हे मी विचारले नव्हते. मी जर ते नाव थांबवले असते, तर तुम्हाला संशय घ्यायला जागा होती. त्यामुळे नंतरच्या बोलण्याला काही अर्थ उरत नाही. - राज ठाकरे

mns Raj Thackeray interview I have a dream come true of Maharashtra my comfort with BJP | माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका

माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरणारे स्वप्न, माझा कम्फर्ट भाजपसोबत; राज ठाकरेंनी मांडली रोखठोक भूमिका

विशेष मुलाखत

काँग्रेसचे आमदार फोडून पुलोद स्थापन केले तेव्हा ऐक्यावर ओरखडा उमटला. पुढे सगळे तुटत गेले. सुरुवात शरद पवार यांनी केली. जातीयवादी टोप्या पवारांनी बदलल्या. टिळकांची पगडी काढून त्यांनी जोतिबा फुले यांची पगडी घातली. लोकमान्य टिळकांचे योगदान नाही, असे पवारांचे म्हणणे आहे का..? टिळकांची पुणेरी पगडी पवारांनी उतरवली. त्याचे फुटेज उपलब्ध आहे. नंतर त्यांनी फुले पगडी घातली. यापुढे आपल्या पक्षात हीच फुले पगडी घालायची, असेही सांगितले. यातून त्यांची प्रवृत्ती कळते. मनसे पक्ष प्रमुख राज ठाकरे यांनी मुंबई लाेकमतचे संपादक अतुल कुलकर्णी यांना दिलेली मुलाखत.

प्रश्न : विद्यमान आमदारांविरोधात शिंदे  गट काम करत असल्याच्या तक्रारी आहेत.
उत्तर : काही गोष्टींचे संबंध जपणे खूप आवश्यक आहे. ही गोष्ट एकनाथ शिंदे यांनी पाळली पाहिजे असे माझे मत आहे. माझी ही चौथी, पाचवी निवडणूक आहे. शिंदे यांची पहिलीच निवडणूक आहे. याआधी ते फक्त ठाणे पाहत होते. महाराष्ट्र नाही. गेल्या लोकसभेला भाजप आणि मनसेची मते त्यांना मिळाली हे त्यांनी विसरू नये. श्रीकांत शिंदे आणि राजू पाटील यांच्यातले मतभेद मी ते मिटवले. राजू पाटील यांनी त्यांच्यासाठी मनापासून काम केले होते. मला असे वाटते की, काही गोष्टींच्या जाणिवा आपण ठेवल्या पाहिजेत. असे जर ठेवले नाही तर राजकारण हे बदलत असते. बदलत्या काळात पुढे जेव्हा गरज लागेल तेव्हा आम्हालाही काही गोष्टींचा विचार करता येईल.

प्रश्न : माझ्या हाती महाराष्ट्र द्या, असे तुम्ही म्हणता. तेव्हा तुम्हाला मुख्यमंत्री व्हायचे आहे का? आपण स्वतः मुख्यमंत्री होऊन काम करणे आणि रिमोट कंट्रोल म्हणून काम करणे यात फरक आहे...
उत्तर : माझ्याकडे महाराष्ट्राचे सत्यात उतरू शकणारे स्वप्न आहे. मी बसून केले किंवा करून घेतले, लोकांना ती गोष्ट होण्याशी मतलब आहे. मी ती गोष्ट करवून घेणे 
आणि मी ती गोष्ट करणे दोन्ही गोष्टी 
संभव आहेत. मला खुर्चीचा सोस नाही. चांगल्या गोष्टी घडवण्याला प्राधान्य दिले पाहिजे.

प्रश्न : पण तुम्ही स्वतः मुख्यमंत्री होणे व इतरांकडून करून घेणे यात फरक आहे.
उत्तर : मी ज्या मुशीतून आलो तो भाग वेगळा. बाळासाहेब ठाकरे निवडणुकीला उभे राहणार नाहीत मुख्यमंत्री होणार नाही हे त्यांनी स्पष्ट केले होते तरीही लोकांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून सरकार हाती दिलेच ना. लोकांना कामे होण्याशी मतलब आहे. महाराष्ट्रात भाजपला होणारे मतदान नरेंद्र मोदी यांच्याकडे बघूनच झाले ना. ते थोडेच मुख्यमंत्री आहेत... काेण काम करवून घेतो ते जास्त महत्त्वाचे आहेत.

प्रश्न : सरकार बनवायची वेळ आली, तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे दोघांमध्ये कोणाशी जास्त कम्फर्ट आहे..?
उत्तर : माझा दोघांशीही कम्फर्ट आहे. काँग्रेस राष्ट्रवादीसोबत माझा कधी संबंध झाला नाही, त्यामुळे त्यांच्याशी कम्फर्ट असण्याचा प्रश्नच नाही. मला काय करायचे आहे, याविषयी कोणीच विचारत नाही. मी सातत्याने भूमिका बदलतो, असा आक्षेप घेतात; पण शरद पवार, उद्धव ठाकरे, भाजप यांनी किती वेळा भूमिका बदलल्या, याची मी यादी द्यायला तयार आहे.

प्रश्न : तुमची ब्ल्यू प्रिंट लोकांना आवडली नाही का? अतिशय चांगले व्हिजन देऊनही लोकांनी तुम्हाला का स्वीकारले नाही..?
उत्तर : मी २०१४ मध्ये घटस्थापनेच्या दिवशी मोठ्या कार्यक्रमात तीन तास चर्चा करून महाराष्ट्राची ब्ल्यू प्रिंट ठेवली. त्याच दिवशी भाजप-शिवसेना युती तुटली. माध्यमांचा सगळा फोकस तिकडे गेला. चर्चा युती कशी तुटली याची सुरू झाली. त्यामुळे ब्ल्यू प्रिंट विषय मागे पडला. 

प्रश्न : भाजपने एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना सोबत घेऊन सरकार बनवले. हे करण्याची भाजपला गरज होती?
उत्तर : संपूर्ण बहुमत हातात असताना उद्धव ज्या प्रकारे त्यांच्याशी वागले. एका बाजूला भाजपाला छळताना दुसरीकडे काँग्रेससोबत चर्चा सुरू केली. इतकी वर्ष तुम्ही ज्यांच्या विरोधात प्रचार केला त्यांच्याबरोबर 
अख्खा शिवसेना पक्ष बसतो. केवळ 
स्वतःच्या मुख्यमंत्रिपदासाठी... स्वतःच्या स्वार्थासाठी...

प्रश्न : उद्धव यांनी फक्त मुख्यमंत्रिपदासाठी काँग्रेससोबत जाण्याचे ठरविले का?
उत्तर : १०० टक्के. यात दुसरे कोणतेही कारण नाही. उद्धवनी एकनाथ शिंदे यांना तुम्हाला मुख्यमंत्री करतो असे सांगून स्वतःच मुख्यमंत्रिपद घेतले. स्वतःच्या स्वार्थासाठी म्हणून त्यांनी या गोष्टी केल्या. मी माझ्या स्वार्थासाठी भूमिका बदलल्याचे एक उदाहरण दाखवा. शरद पवारांनी एवढ्या भूमिका बदलल्या, की भूमिकाही त्यांना लाजेल... उद्धवने काँग्रेससोबत जाताना भूमिका बदलली नाही का? भाजपने किती राज्यात किती भूमिका बदलल्या?

प्रश्न : सगळेच भूमिका बदलतात, असे तुम्ही म्हणता. मग त्याच भाजपला आपला त्याला पाठिंबा राहील, असे कसे म्हणता?
उत्तर : आत्ता परिस्थिती तशी आहे. माझा कम्फर्ट भाजपसोबत आहे. आता वरचढ मला युती दिसत आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री कोण होईल हे ठरवले जाईल, असे म्हणत अमित शहा यांनी संकेत दिले आहेतच.

प्रश्न : मग तुम्ही भाजपच्या विरोधात उमेदवार कसे उभे केले?
उत्तर : मी स्वतंत्रपणे निवडणूक लढवतो आहे. मी युतीत नाही. माझे उमेदवार त्यांच्यासमोर येणारच. आता माझी लढाई चौघांच्याही विरुद्ध आहे. ही युनिक निवडणूक आहे. अशा पद्धतीची निवडणूक महाराष्ट्राच्या इतिहासात आजपर्यंत झाली नाही. सात पक्ष एकमेकांविरुद्ध उभे आहेत. सगळ्यांसाठी ही नवीन गोष्ट आहे, कोण कोणाविरुद्ध निवडून येईल हे कोणीही आज सांगू शकत नाही.

 

Web Title: mns Raj Thackeray interview I have a dream come true of Maharashtra my comfort with BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.