मुंबई-
राज्यातील महानगरपालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तारखांची घोषणा लवकरच होऊ शकते. याच पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी निवडणुकीसाठीची तयारी सुरू करण्याचा निर्धार केला आहे. राज्यातील सर्वात महत्वाची आणि प्रतिष्ठेची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मनसे रणशिंग फुंकणार आहे. येत्या २ फेब्रुवारी रोजी वांद्रे येथील एमआयजी क्लबमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक बोलाविण्यात आली आहे. या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार असून आगामी निवडणुकीसाठीच्या रणनितीवर चर्चा केली जाण्याची शक्यता आहे.
मनसेनं मुंबईसह ठाणे, पुणे, पिंपरी-चिंचवड येथील पक्ष पदाधिकाऱ्यांना बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत. पदाधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांना देखील राज ठाकरे संबोधित करणार आहेत. राज ठाकरे महापालिका निवडणुकीसाठी नेमकी कोणती भूमिका घेणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
भाजपा-मनसे युती होणार?शिवसेनेनं भाजपाशी फारकत घेतल्यानंतर एकट्या पडलेल्या भाजपासोबत मनसेची पालिका निवडणुकीसाठी युती होण्याच्या चर्चा रंगल्या आहेत. राज्याच्या राजकारणात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची आघाडी झाल्यामुळे एक वेगळंच वळण मिळालं आहे. त्यामुळे मुंबई मनपा निवडणुकीत याचे पडदास उमटण्याची शक्यता आहे. याच पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचा पराभव करण्यासाठी भाजपा आणि मनसे एकत्र लढणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. समोर आलेल्या माहितीनुसार भाजपा आणि मनसेची जाहीर युती झाली नसली तरी निवडणुकीत मनसे भाजपाला छुपा पाठिंबा देणार असल्याचं बोललं जात आहे.