मुंबई-
राज्यातील सध्याची राजकीय उलथापालथ आणि आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मनसे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. मनसेनं विधानसभेत शिंदे सरकारला पाठिंबा देत याआधीच संकेत दिले आहेत. तसंच राज ठाकरेंनी अतिशय शेलक्या शब्दांत शिवसेनच्या फुटीवर भाष्य केलं होतं. पण आता स्वत: राज ठाकरे मैदानात उतरण्यासाठी सज्ज झाले आहेत. येत्या १३ जुलै रोजी मनसेचे महत्वाचे नेते, सरचिटणीस आणि विभाग अध्यक्षांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला स्वत: राज ठाकरे संबोधित करणार आहेत.
राज ठाकरेंच्या पायावर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना काही काळ आरामाचा सल्ला दिला होता. राज ठाकरे सक्रियरित्या पक्ष कार्यक्रमात भाग घेऊ शकत नसले तरी त्यांचा सुपुत्र अमित ठाकरे गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या दौऱ्यावर आहे. अमित ठाकरे यांनी नुकतंच कोकण दौरा केला. यात अमित ठाकरेंनी मनसेच्या विद्यार्थी सेनेच्या बांधणीवर विशेष लक्ष दिलं. राज्यातील सध्याच्या परिस्थितीचा फायदा पक्षाला कसा होऊ शकेल यावर लक्ष केंद्रीत करत तरुण मतदारांना आकर्षित करण्यासाठी मनसेचा गनिमीकावा सुरू आहे.
अमित ठाकरे पुनर्बांधणीसाठी महासंपर्क अभियान घेत असताना आता स्वत: राज ठाकरे देखील नव्या दमानं पक्षात सक्रियरित्या कामाला लागणार आहेत. राज ठाकरेंची प्रकृती आता उत्तम असून तेही पक्ष कार्यक्रमांना स्वत: उपस्थिती लावणार असल्याची माहिती समोर आली आहे. याचाच एक भाग म्हणून १३ जुलै रोजी मनसेची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत राज ठाकरे पदाधिकाऱ्यांना काय मार्गदर्शन करतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे.