मुंबई – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याकडे पाहिलं तर आदरयुक्त भीती प्रत्येक कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण होते. राज ठाकरे महाराष्ट्रातील असं नेतृत्व आहेत ज्यांच्या सभांना लाखोंची गर्दी जमते. मनसेचे किती आमदार, नगरसेवक निवडून येतात हा चर्चेचा विषय आहे. परंतु राज ठाकरेंसारखा वक्ता महाराष्ट्रातील प्रत्येक जनतेला हवाहवासा वाटतो. अलीकडे राज ठाकरे यांचं वेगळं रुप सर्वांनाच पाहायला मिळत आहे.
पुणे दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरेंनी(Raj Thackeray) मोजक्या शाखाध्यक्ष, कार्यकर्त्याच्या घरी हजेरी लावत त्यांच्या कुटुंबाशी मनमोकळ्या गप्पा मारल्या होत्या. मनसे पदाधिकाऱ्यांच्या घरातलं कुणी निधन पावलं असेल तर राज ठाकरेंनी आर्वुजून त्या कार्यकर्त्यांच्या घरी जाऊन त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. कार्यकर्त्यांमध्ये मिसळणारं हे राज ठाकरेंचे नवं रुप मनसेत नवचैतन्य निर्माण करणारं आहे.
यातच सध्या मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राज ठाकरेंचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. हा व्हिडिओही जरा हटके आहे. मनसेच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण आणि काही पदाधिकारी राज ठाकरेंच्या भेटीला शिवतीर्थवर गेले होते. याठिकाणी सहज बोलता बोलता मनोज चव्हाण यांनी आज खांदा खूप दुखतोय साहेब असं म्हटलं. त्यावर राज ठाकरेंनी थांब जरा, म्हणत सहकाऱ्याकडून मलम मागवत मनोज चव्हाण यांच्या खांद्यावर स्वत: हाताने ते लावले. हा व्हिडिओ पाहिला तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे वेगळेच रुप सध्या महाराष्ट्राला पाहायला मिळत नाही. यावर अविनाश जाधव यांनी मी राजसाहेबांना दैवत का म्हणतो याची प्रचिती पुन्हा एकदा आल्याचं म्हटलं आहे.
कोरोना काळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या जुन्या कृष्णकुंज निवासस्थानी समस्या घेऊन येणाऱ्यांची संख्या जास्तच होती. राज ठाकरेंकडे एखादा विषय मांडला तर त्यावर नक्कीच न्याय मिळतो अशी धारणा लोकांची झाली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी राज्य सरकारशी पाठपुरावा करत लोकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. शिवसेना सोडल्यानंतर राज ठाकरेंनी पहिल्याच झटक्यात १३ आमदार निवडून आणले होते. परंतु कालांतराने मनसे पिछाडीवर गेली. एकएक आमदार, पदाधिकारी यांनी पक्षाला रामराम केला. त्यानंतर मध्यंतरी राज ठाकरेंनी मनसेची वाटचाल हिंदुत्वाच्या दिशेने करत पक्षाचा झेंडाच बदलून टाकला. त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी, दौरे, सतत संवाद साधत असल्याचं दिसून येत आहे.