वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..."

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2024 11:17 AM2024-08-05T11:17:41+5:302024-08-05T11:26:46+5:30

मनसेने वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे.

MNS Raj Thackeray will field candidate against Aditya Thackeray in Worli Assembly Constituency | वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..."

वरळीत आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का? राज ठाकरे म्हणाले, "मला काही देणं घेणं नाही..."

Raj Thackeray on Worli Assembly constituency : राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीकडून विधानसभा निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरु झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने विधानसभा निवडणुकीत स्वबळावर लढण्याची घोषणा केली आहे. अशातच विधानसभा निवडणुकीत वरळी मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेने संदीप देशपांडे यांना रिंगणात उतरविण्याची तयारी सुरू केली आहे. गेल्या विधानसभा निवडणुकीत मनसेनेवरळीत उमेदवार दिला नव्हता. मात्र आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीच आदित्य ठाकरेंच्या विरोधात उमेदवार उभा करणार असल्याचे म्हटलं आहे.

लोकसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातून मताधिक्य कमी झाल्यानंतर मनसेने तिथे उमेदवार देण्याचं ठरवलं होतं. आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात मनसेने प्रभावीपणे प्रचार सुरु केला आहे. आदित्य ठाकरेंविरोधात संदीप देशपांडे यांना मनसेकडून उमेदवारी देण्यात येणार असल्याचे म्हटलं जात आहे. अशातच सोलापुरात बोलताना राज ठाकरे यांनी वरळी मतदारसंघात उमेदवार देणार असल्याचे स्पष्ट केलं आहे. त्यामुळे ठाकरे गट विरुद्ध मनसे असा तगडा सामना या मतदारसंघात रंगण्याची शक्यता आहे.

सोलापुर दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे यांना माध्यमांनी वरळी विधानसभा मतदारसंघात आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार देणार का असा सवाल विचारला होता. त्यावर राज ठाकरे यांनी भाष्य केलं. "कोण कुठल्या मतदारसंघात उभं आहे याच्याशी मला काही देणे घेणं नाही. आम्हाला जिथे उमेदवारी द्यायची आहे तिथे देणार. २००९ मध्ये जेव्हा तिथे निवडणूक लढवली होती त्यावेळी ३८ हजार मते मिळवली होती. यावेळी तिथे निवडणूक लढवणार आहे. संदीप देशपांडे यांना यावेळी उमेदवारी मिळणार आहे. यादी येईल तेव्हा बघा," असे राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान,  २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांना ६७४२७ मते मिळाली होती. मात्र लोकसभा निवडणुकीत दक्षिण मध्य मुंबईचे उमेदवार अरविंद सावंत यांना वरळीतून केवळ ६७१५ मतांचे लीड मिळाले होते. त्यामुळे मनसे नेते संदीप देशपांडे हे वरळीत सक्रीय झाले. या मतदारसंघात मनसेला मानणारा वर्ग आहे. गेली ५ वर्ष आदित्य ठाकरे हे लोकांच्या संपर्कात नाहीत, असा दावा विरोधकांकडून केला जात आहे. तसेच आदित्य ठाकरेंनी मतदारसंघातील समस्या सोडवल्या नसल्याचाही आरोप केला जात आहे. दुसरीकडे भाजपही वरळीत सक्रिय झाली आहे. त्यामुळे विधानसभेला तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.

Web Title: MNS Raj Thackeray will field candidate against Aditya Thackeray in Worli Assembly Constituency

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.