राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2024 06:24 AM2024-11-16T06:24:44+5:302024-11-16T06:25:39+5:30
परवानगी मिळाल्यास सभा होईल अन्यथा बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा होईल, असेही परब यांनी सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : प्रचारसभेला परवानगी मिळाली तरी तयारीसाठी पुरेसा वेळ हातात नसल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी रविवारी, १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्क मैदानावर मनसेची सभा होणार नाही, असे स्पष्ट केल्याने आता उद्धवसेनेला प्रचारसभेसाठी परवानगी मिळेल का, याविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. सभेसाठी मैदान मिळावे यासाठी संबंधितांना यापूर्वीच स्मरणपत्र पाठवले असल्याचे उद्धवसेनेचे नेते अनिल परब यांनी स्पष्ट केले. परवानगी मिळाल्यास सभा होईल अन्यथा बीकेसीमध्ये महाविकास आघाडीची सभा होईल, असेही परब यांनी सांगितले.
प्रचारसभेसाठी १७ नोव्हेंबरला शिवाजी पार्कचे मैदान मिळावे यासाठी मनसे आणि उद्धवसेना यांनी अर्ज केले होते. मनसेला परवानगी मिळाली असली तरी अवघ्या दीड दिवसात सभेची तयारी करणे शक्य नसल्याचे सांगत मनसेने नकार दिला. मैदानासाठी परवानगी मिळण्यात निश्चितता नसते, हा पूर्वानुभव लक्षात घेता उद्धवसेनेने खबरदारीचा उपाय म्हणून बीकेसीतील एनएमआरडीएचे मैदान आरक्षित केले आहे. त्यामुळे पालिकेने शिवाजी पार्कसाठी परवानगी नाकारली तरी त्यांच्याकडे ‘बीकेसी’चा पर्याय उपलब्ध आहे.
सभा रद्द झाल्याने आश्चर्य
बीकेसीतील मैदानावर प्रचारसभा घेण्याचा पर्याय मनसेकडे उपलब्ध होता. एमएमआरडीएने त्यास परवानगीही दिली होती. मात्र, तिथेही मनसेची सभा होण्याची शक्यता नाही. शिवाजी पार्क येथील सभा रद्द झाल्याने मनसैनिकांचा भ्रमनिरास झाला.