राज ठाकरेंवर आक्षेपार्ह टिप्पणी करणारी तनुश्री 'बिग बॉस'मध्ये गेल्यास 'खळ्ळ-खटॅक': मनसे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 04:02 PM2018-10-01T16:02:32+5:302018-10-01T16:02:51+5:30
तनुश्री बिग बॉसमध्ये गेल्यास शो चालू देणार नाही, असा इशारा मनसेनं दिला
मुंबई: अभिनेते नाना पाटेकरांनंतर गंभीर आरोप केल्यानं चर्चेत आलेली अभिनेत्री तनुश्री दत्तानंमनसेप्रमुखराज ठाकरेंवरही तोंडसुख घेतलं आहे. राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. ती मिळाली नाही, म्हणून त्यांनी गुंडांना एकत्र आणून स्वत:चा पक्ष स्थापन केला, असा घणाघात तनुश्रीनं केला. यावर मनसेनं प्रतिक्रिया दिली आहे. बिग बॉसमध्ये जाण्याच्या हेतूनं तनुश्रीकडून बेताल विधानं केली जात आहेत. तनुश्री बिग बॉसमध्ये गेल्यास खळ्ळ-खटॅक करण्यात येईल, असा इशारा मनसेच्या चित्रपट विभागाचे प्रमुख अमेय खोपकर यांनी 'लोकमत'शी बोलताना दिला.
तनुश्रीला बिग बॉसमध्ये सहभागी व्हायचं असल्यानं तिच्याकडून बेताल विधानं केली जात आहेत, असं अमेय खोपकर म्हणाले. 'तनुश्रीला बिग बॉसमध्ये जायचं आहे. ती बिग बॉसमध्ये गेल्यास मनसे बिग बॉस चालू देणार नाही. मग आमच्याकडून मनसे स्टाईल उत्तर देण्यात येईल,' असं खोपकर म्हणाले. तनुश्री बिग बॉसमध्ये सहभागी झाल्यास खळ्ळ-खटॅक करण्यात येईल, असा इशारा खोपकर यांनी दिला. तनुश्रीविरोधात कायदेशीर कारवाई करणार नसल्याचं खोपकर यांनी सांगितलं. तनुश्रीविरोधात कारवाई केल्यास तिचं महत्त्व वाढेल, असं ते म्हणाले.
काय म्हणाली होती तनुश्री दत्ता?
राज ठाकरेंना बाळासाहेबांची खुर्ची हवी होती. पण ती बाळासाहेबांचे चिरंजीव उद्धव ठाकरेंना मिळाली. त्यामुळे त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन केला, असं तनुश्रीनं म्हटलं होतं. नालायक जेव्हा स्वतःला लायक म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा फक्त तोडफोड होते. गुंडांना त्यानं एकत्र आणलं आणि आपला पक्ष स्थापन केला. आता आपल्या गुंडांना पाठवून तो ठिकठिकाणी तोडफोड करतो. ज्यांना कुठे तोडफोड करायची असले, त्यांनी मनसेशी संपर्क साधायला हवा. बाळासाहेबांची खुर्ची न मिळाल्याची खंत त्याला आजही वाटते. लीडर न झाल्याचे शल्य त्याच्या मनात आहे. कुणीच तुला लीडर बनवणार नाही. कारण लोकांना सरकार राज नकोय. लीडर तो असतो, जो गरजू लोकांची, महिलांची सुरक्षा करतो. महिलांवर दबाव टाकत नाही आणि महिलांच्या गाडीवर हल्ला चढवत नाही, असं तनुश्रीनं म्हटलं होतं.