Join us  

"मराठी माणूस यांची..."; बिनशर्ट पाठिंबा म्हणणाऱ्या उद्धव ठाकरेंना मनसेचे जोरदार प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2024 1:35 PM

ठाकरे गटाच्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला मनसेने आता प्रत्युत्तर दिलं आहे.

Uddhav Thackeray : बुधवारी शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन पार पडला. शिवसेनेच्या फुटीनंतर सलग दुसऱ्यांदा पक्षाच्या वर्धापन दिनाचे दोन कार्यक्रम पार पडले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा वर्धापन दिन सोहळा माटुंग्याच्या षण्मुखानंद सभागृहात पार पडला. यावेळी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर नाव न घेता बोचरी टीका केली. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत उमेदवारांचा प्रचार केला होता. याच पाठिंब्यांवरुन उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंवर शेलक्या शब्दात टिका केली. लोकसभा निवडणुकीत काहींनी मोदींना बिनशर्ट पाठिंबा दिला होता असा टोला उद्धव ठाकरेंनी लगावला होता. याला आता मनसेने जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्यासाठी मनसेकडून महायुतीला बिनशर्त पाठिंबा देण्यात येत असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले होते. राज ठाकरे यांनी महायुतीच्या उमेदवारांसाठी तीन सभा देखील घेतल्या होत्या. मात्र आता ठाकरे गटाच्या वर्धापनदिनानिमित्त दिलेल्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंनी म राज ठाकरेंवर अप्रत्यक्षपणे टीका केली. या टिकेनंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना जशास तसे प्रत्युत्तर दिलं आहे.

"लोकसभा निवडणुकीमुळे मित्र कोण आणि शत्रू कोण हे समोर आलं. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ पाठिंबा दिला. उघड पाठिंबा म्हणजे बिनशर्ट पाठिंबा दिला, तर काही जणांनी भाजपाला विरोध करण्याचे नाटक करून पाठिंबा दिला. मात्र, आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही," सं उद्धव ठाकरेंनी म्हणत सूचक विधान केलं.

मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्वव ठाकरेंच्या टीकेला एक्स सोशल मिडिया अकाऊंटवरुन प्रत्युत्तर दिलं आहे. "हिरव्या मतांच्या जोरावर यश मिळवल्या मुळे काही लोक पांचट जोक मारत  आहेत.  पण  येणाऱ्या निवडणुकीत मराठी माणूस यांची चड्डी पण शाबूत ठेवणार  नाही," असं संदीप देशपांडे यांनी म्हटलं आहे.

"पक्ष फोडायचे, सरकार पाडायचं, फोडलेल्या लोकांना मंत्रिपदं द्यायची हा लोकशाहीची हत्या करणारा नक्षलवाद आहे. आज मी मिंधे आणि भाजपाला आव्हान देतोय जर तुम्ही षंढ नसाल तर शिवसेनाप्रमुखांचा फोटो न लावता, माझ्या शिवसेनेचं चिन्ह न चोरता माझ्यासमोर निवडणूक लढून दाखवा. मला एका गोष्टीचा अभिमान नक्की आहे की आम्ही बाळासाहेब ठाकरेंचाच फोटो वापरला दुसऱ्या कुणाचाही फोटो वापरला नाही," असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं होतं. 

टॅग्स :महाराष्ट्रउद्धव ठाकरेमनसेसंदीप देशपांडेराज ठाकरे