मुंबई - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आवाज कुणाचा या पॉडकास्टसाठी मुलाखत दिली. त्यामध्ये, शिवसेना पक्षातील बंडखोरी, राज्यातील महायुती सरकार, केंद्रातील मोदी सरकार, विरोधकांनी झालेली एकता, मणीपूर घटना, इर्शाळवाडी दुर्घटनांसह विविध मुद्द्यांवरील प्रश्नांना उत्तरे दिली. सामनाचे संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची ही मुलाखत घेतली. नेहमीच्या स्टाईलने राऊत यांनी स्फोटक मुलाखत असल्याचं वर्णनही केलं. आता, त्यावरुनच मनसेनं या मुलाखतीची खिल्ली उडवली आहे.
संजय राऊत यांनी दोन भागात उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राऊत यांनी राज-उद्धव एकत्र येण्यासंदर्भातही प्रश्न विचारला होता. त्यावर, मी जर तर विचार करत नाही, आता काय आहे त्यावर निर्णय घेतो, असे उत्तर उद्धव ठाकरेंनी दिले. दरम्यान, या मुलाखतीची भाजपाकडून खिल्ली उडवली जात आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर दिलंय. तर, प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ट्विट करुन घरगुती मुलाखत असल्याचे सांगत खिल्लीही उडवली आहे. तर, मनसेनं चक्क दोन मिनिटांचा व्हिडिओ बनवत, या मुलाखतीची खिल्ली उडवली. त्यामध्ये, उद्धव ठाकरेंच्या भूमिकेत स्वत: संदीप देशपांडे दिसून येतात, तर संजय राऊत यांच्या पेहरावात मनसेचे संतोष पाहायला मिळतात.
संदीप देशपांडे यांनी भगव्या रंगाचा कुर्ता परिधान करत उद्धव ठाकरेंची नक्कल केल्याचं या व्हिडिओत दिसतं. तर, संतोष हे संजय राऊत यांची स्टाईल मारताना दिसून येतात. संतोष यांच्या प्रश्नावर संदीप देशपांडे हे उद्धव ठाकरेंची नक्कल करतात, तसेच त्यांच्या भाषणातील अनेक शब्दप्रयोग करतात आणि किंबहुना.. किंबहुना.. म्हणत या मुलाखतीची खिल्ली उडवत असल्याचं पाहायला मिळते.