Join us  

“कुछ फोटो सच्चे भी होते है!”; शरद पवार आणि बृजभूषण सिंह एकत्र; मनसेने शेअर केला फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: May 24, 2022 9:22 AM

अयोध्या दौरा रद्द व्हावा यासाठी महाराष्ट्रातूनच रसद पुरवली जात असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले होते.

मुंबई: मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी आपला पूर्वनियोजित अयोध्या दौरा रद्द केला. केवळ प्रकृतीचे कारण नाही, तर हा एक सापळा असून, महाराष्ट्रातूनच त्याला रसद पुरविली जात असल्याचा दावा करत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणे विषद केली. यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली. मात्र, यानंतर आता मनसेकडून एक फोटो शेअर करण्यात आला असून, त्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असल्याचे सांगितले जात आहे. या फोटोत राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला कडवा विरोध करणारे भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) एकत्र दिसत आहेत.

राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्याला उत्तर प्रदेशातील भाजप खासदार बृजभूषण शरण सिंह यांनी आक्रमकपणे विरोध केला. पुण्यातील सभेत राज ठाकरे यांनी अयोध्या दौरा रद्द करण्याची कारणांसह टीकाकारांचा खरपूस समाचार घेतला. यानंतर आता मनसेचे सरचिटणीस सचिन मोरे यांनी आपल्या ट्विटरवरून एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्याचे सांगितले जात आहे. 

कुछ फोटो सच्चे भी होते है!

मनसे नेते सचिन मोरे यांनी शेअर केलेला फोटो एका कार्यक्रमातील आहे. याच कार्यक्रमात बृजभूषण सिंह यांच्यासह शरद पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे याही दिसत आहेत. सचिन मोरे यांनी शेअर केलेल्या या फोटोला कुछ फोटो अच्छे भी होते है, और सच्चे भी होते है, असे कॅप्शन दिले आहे. सचिन मोरे यांनी बृजभूषण सिंह यांचे फोटो शेअर केले असून, याद्वारे त्यांनी अप्रत्यक्षपणे राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे. राज ठाकरे यांच्या दौऱ्याला होत असलेल्या विरोधामागे राष्ट्रवादीचाच हात असल्याकडे सचिन मोरे यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळत आहे. 

दरम्यान, बृजभूषण सिंह हे गेल्या अनेक वर्षांपासून भारतीय कुस्ती महासंघांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, तर शरद पवार हे राज्य कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष आहेत. मनसे नेत्याने शेअर केलेले फोटो एका कुस्ती स्पर्धेतीलच असल्याचे दिसत आहे. सन्मान लाल मातीचा, बहुमान मावळवासियांचा, असे या फोटोतील बॅनरवर लिहिलेले दिसत आहे.

टॅग्स :राज ठाकरेमनसे