मुंबई: एकीकडे राज्यातील राजकीय संघर्ष सुरू असताना दुसरीकडे आता मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी सर्वच पक्षांकडून हळूहळू मोर्चेबांधणी सुरू करण्यात आल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्क मैदनावरून मनसेनेआदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. तसेच शिवाजी पार्क मैदानाची वाट लावल्याचा दावा करण्यात आला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी भर पावसात शिवाजी पार्क मैदानातील परिस्थिती आढावा घेतला. यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरेंनी स्वतःच्या ईगोसाठी जनतेचे ४ कोटी रुपये खर्च केले आहेत. यापैकी २ कोटी रुपयांची केवळ माती आणून घातलेली आहे. रेनवॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प कोलमडला असल्याचा दावा संदीप देशपांडे यांनी केला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंकडे कारवाईची मागणी
छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानाची जी वाट लागली आहे त्याला जबाबदार असण्याऱ्या विरप्पन गॅंग आणि वॉर्ड ऑफिसर किरण दिगावकर यांच्यावर काय कारवाई करणार, अशी विचारणा करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. दुसरीकडे पावसाला सुरुवात होताच मुंबईत अनेक ठिकाणी नाले तुंबल्याच्या घटना घडल्या आहेत. नाले तुंबल्यामुळे रस्त्यावरच पाणी साचून राहत आहेत. याचा मनस्ताप स्थानिक रहिवाशांना सहन करावा लागत आहेत. या मुद्द्यावरून आता भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर बोचरी टीका केली आहे.
आदित्यसेनेने भ्रष्टाचाराची गटारगंगा केली
देशात आर्थिक विकासाची गंगा आणणाऱ्या आपल्या मुंबईला आदित्यसेनेने ठेकेदारांसाठी भ्रष्टाचाराची गटारगंगा केली आहे, अशी कॅप्शन नितेश राणे यांनी ट्विटला दिली आहे. नितेश राणे यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत, आदित्य ठाकरे यांनी केलेली विधानं कशी फोल ठरली आहेत, याची तुलना केली आहे. मुंबईतील अनेक रस्त्यावर पाणीसाचून नागरिकांना त्रास होत असलेले व्हिडिओमध्ये दिसत आहे. पहिल्याच पावसाने केली मनपाची पोलखोल, नालेसफाईच्या कामात झालाय झोल, टक्केवारी वीरांनी मुंबईकरांचे ५ हजार कोटी बुडवून दाखवले, कंत्राटदार आले पैशात न्हाऊन, मुंबईकर गेला पावसात वाहून, मुंबईची तुंबई करून दाखवली, अशी खोचक टीका करण्यात आली आहे.