मुंबई - घरातील कमकुवत मुलावर आई वडिलांचं जास्त प्रेम असतं. बाळासाहेबांच्या पुण्याईवर जगणारी ही बांडगुळं आहेत. स्वत:चं कर्तृत्व शून्य. कोरोना काळात अडीच वर्ष मंत्रालयात गेले नाहीत. मंत्रालयातील मुख्यमंत्र्यांची खुर्ची खाली ठेवली आणि कालच्या सभेत संजय राऊतांची खुर्ची खाली ठेवली. ज्यांचे स्वत:चे कर्तृत्व नाही त्यांना काय उत्तर देणार अशा शब्दात मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
संदीप देशपांडे म्हणाले की, गेल्या २५ वर्षात पालिकेचा इतका पैसा खाल्लाय ते कधीतरी उघड होईल. ज्यावेळी ते समोर येईल तेव्हा व्यासपीठावरील अनेक खुर्च्या खाली राहतील. महापालिकेची निवडणूक फेब्रुवारीत होणार होती. मग तेव्हा निवडणूक पुढे का ढकलली? सत्तेत असणारे निवडणुकीला का घाबरतात ते माहिती नाही. गुदगुदल्या केल्या तरी हे घाबरतील असा टोला त्यांनी लगावला.
तसेच बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील असले तरी ते संपूर्ण महाराष्ट्राची विचारधारा आहेत. बाळासाहेब ठाकरे ही एक व्यक्ती नाही तर विचार आहे. विचारांवर कुणाचा हक्क नसतो. त्यामुळे तुम्ही कितीही ओरडला तरी ती विचारधारा सगळ्यांची आहे. त्यावर वैयक्तिक मालकी कुणाची नाही. दुसऱ्यांचं ओरबडून जगणारी ही बांडगुळं आहेत. दसरा मेळावा कुणीही घेतला तरी बाळासाहेबांचे विचार ऐकायला मिळतील याची शाश्वती आहे का? असा सवाल संदीप देशपांडे यांनी विचारला.
पोरी पुरता उरलाय साडेतीन जिल्ह्याचा राजाफक्त ४ खासदार तरी वाजवताय बाजा, पोरी पुरताच उरलाय साडेतीन जिल्ह्याचा राजा असं आमच्या कामगार सेनेचे अध्यक्ष मनोज चव्हाण यांनी पोस्ट केलीय. ही पोस्ट तंतोतंत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांवर लागू होते असं सांगत मनसेने राष्ट्रवादीची खिल्ली उडवली.
विदर्भात १ हजार मनसे शाखा उघडणारविदर्भाचा दौरा अतिशय समाधानकारक झाला. पदाधिकारी, कार्यकर्त्यांसोबत राज ठाकरेंच्या गाठीभेटी झाल्या. आगामी काळात मनसे प्रबळपणे विदर्भात वाढेल. येणाऱ्या ३ महिन्यात मनसेच्या १ हजार शाखा विदर्भात उघडण्यासाठी आमची वाटचाल सुरू आहे. पक्षबांधणी ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. दौरे सुरूच राहतील. ३० तारखेच्या आत विदर्भातील नवी कार्यकारणी पक्षाचे अध्यक्ष जाहीर करतील. कार्यकर्त्यांना ऊर्जा देणे गरजेचे आहे. पक्षाची ध्येय धोरणे लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी प्रयत्न होत आहे असं संदीप देशपांडेंनी म्हटलं.