“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे किती मिनिटांचा दौरा करतात, हे पाहावं लागेल”; मनसेचा खोचक टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2021 02:50 PM2021-09-30T14:50:00+5:302021-09-30T14:58:32+5:30
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार असून, पूरस्थितीची पाहणी करणार आहेत.
मुंबई: गेल्या काही महिन्यांपासून राज्यातील अनेक भागांना एकामागून एक चक्रीवादळे आणि अतिवृष्टीचा जोरदार तडाखा बसला आहे. सामान्य नागरिकांपासून ते शेतकऱ्यांपर्यंत खूप मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. यावरून महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि विरोधी पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. यातच आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करणार असून, पूरस्थितीची पाहणी करणार आहेत. यावरून मनसेने टोला लगावला असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा मराठवाडा दौरा किती मिनिटांचा होतो, हे पाहावे लागेल, असे म्हटले आहे. (mns sandeep deshpande criticised over cm uddhav thackeray about visit marathwada)
अलीकडेच राज्याचे पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तर, पावसामुळे महाराष्ट्राचे मोठे नुकसान झाले आहे. पंतप्रधान मोदींनी गुजरातला १ हजार कोटींची मदत दिली होती. महाराष्ट्रातील नुकसानीची तुलना केल्यास केंद्र सरकारने ७ हजार कोटींची मदत दिली पाहिजे, अशी मागणी केली होती. यानंतर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मराठवाड्याचा दौरा करून पूरपरिस्थितीची पाहणी करणार आहेत. मुख्यमंत्र्यांच्या या दौऱ्यावरून मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी टीका केली आहे.
सरकार शेतकऱ्यांना मदत करेल ही अपेक्षा
संदीप देशपांडे यांनी माध्यमांशी संवाद साधताना ठाकरे सरकारवर टीकास्त्र सोडले. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावर प्रतिक्रिया देताना, मुख्यमंत्री किती मिनिटांचा दौरा करतात, हे पाहावे लागेल, असा टोला संदीप देशपांडे यांनी यावेळी लगावला. राज्य सरकारने शेतकऱ्यांना मदत करावी, अशीच अपेक्षा आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही यासाठीच सरकारला पत्र लिहिले होते. कोकणात अद्यापही मदत मिळालेली नाही. जाहीर केलेली तुटपुंजी मदत अजूनही पूरग्रस्तांच्या हातात पडली नाही. शासनाने तातडीने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि प्रत्येकी ५० हजारांची मदत द्यावी, अशी मागणी देशपांडे यांनी केली आहे.
सरकार खोटे बोलत आहे
पूरग्रस्तांना दिलासा देण्यासाठी जे उपाय करणे आवश्यक आहेत, ते लगेच करायला हवेत. मुख्यमंत्री आता दौऱ्यावर जणार आहेत. त्यांना कितपत काय समजेल याबाबत शंका वाटते, असा खोचक टोला लगावत, खड्ड्यांबाबत जनतेत असंतोष आहे. रेल्वे बंद, वाहतूक कोंडी, १५ मिनिटांच्या प्रवासाला दीड तास लागत आहे. ठाकरे सरकारने कोर्टात खोटे प्रतिज्ञापत्र दिले आहे. सरकार खोटे बोलत आहे. निवडणुका जवळ आहेत. आता जनताच न्याय करेल, असे संदीप देशपांडे यांनी म्हटले आहे.