Maharashtra Politics: मुंबईतील प्रभादेवीत मध्यरात्रीच्या सुमारास शिवसेना आणि शिंदे गटात राडा झाला. दादर पोलिसांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनबाहेर कार्यकर्त्याची गर्दी झाली होती. या गर्दीला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. आमदार सदा सरवणकर यांच्यावर गोळीबाराचा आरोप शिवसेनेने केला आहे. पोलिसांनी या आरोपांची चौकशी सुरू केल्याची माहिती आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसेने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे.
दादर, माहीम, प्रभादेवी हे एक सुसंस्कृत मतदारसंघ आहेत. अशा प्रकारच्या हाणामाऱ्या करायला हे काही बिहार राज्य नाही. पोलिसांनी योग्य ती चौकशी करावी आणि जे दोषी असतील, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केली आहे.
शिवसेनेने जे अडीच वर्षांत पेरलेय, ते आता उगवतेय
शिवसेनेने जे अडीच वर्षांत पेरलेय, ते आता उगवतेय. तुम्ही अडीच वर्षांत लोकांवर खोट्या केसेस टाकल्या, त्यांना अडकवण्याचा प्रयत्न केला. माझ्यावर आणि संतोष धुरीवर खोटी केस टाकली की महिला कॉन्स्टेबलला धक्का दिला म्हणून. ती महिला कॉन्स्टेबल आता आहे कुठे? त्यांचे स्टेटमेंट नाही, काही नाही. गेल्या अडीच वर्षांत अशा अनेक खोट्या केसेस तुम्ही लोकांवर टाकल्या. त्यामुळे जे पेरलेय, ते उगवतेय, या शब्दांत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. ते टीव्ही९शी बोलत होते.
दरम्यान, सुनील शिंदे यांनी केलेल्या आरोपांवर, माझ्याकडे बंदुकीचा परवाना आहे. परंतु, मी गोळीबार केलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलो म्हणून मला बदनाम करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे सदा सरवणकर यांनी सांगितले. तसेच परिस्थिती शांत करण्यासाठी आम्ही प्रभादेवी येथे गेलो होतो, असेही सदा सरवणकर म्हणाले.