Shiv Sena Dasara Melava: “दसरा मेळाव्याला बाळासाहेब ठाकरेंचं भाषण खरी पर्वणी, आता सगळंच अळणी”; मनसेचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2021 12:52 PM2021-10-16T12:52:10+5:302021-10-16T12:56:42+5:30
Shiv Sena Dasara Melava: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे.
मुंबई: अपेक्षप्रमाणे शिवसेनेच्या दसरा मेळाव्याचे (Shiv Sena Dasara Melava) भाषण जोरदार झाले. मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विरोधी पक्ष भाजप आणि केंद्रातील मोदी सरकार यांच्यावर ठाकरी भाषेत निशाणा साधला. यावर भाजपसह महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर आणि उद्धव ठाकरेंवर टीका करण्यात आली आहे. दसरा मेळाव्याच्या दिवशी हिंदुहृदयसम्राटांचे भाषण म्हणजे खरी पर्वणी असायची आता मात्र सगळेच अळणी, असा खोचक टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
मी लहानपणापासून दादरला राहतो. दसरा मेळावा हा शिवतीर्थावर व्हायचा, त्यावेळेला आम्ही सर्व जण सन्माननीय हृदयसम्राट बाळासाहेबांचे भाषण ऐकायला जायचो. खरेच ती एक पर्वणी होती नवीन विचार मिळायचा नवीन दिशा महाराष्ट्राला मिळायची. आता मात्र सगळंच अळणी असून गरम पाण्याच्या नावाखाली नुसतेच कोमट पाणी असल्याचा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.
बाळासाहेब ठाकरेंच्या भाषणात एक वेगळीच उर्जा असायची
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणांमध्ये एक वेगळी उर्जा असायची. आता काय सगळ अळणी झालेले आहे. मीठ नसलेल्या जेवणासारखे यंदाच्या दसरा मेळाव्यातील भाषण होते आणि त्यामुळेच अशा पद्धतीचा आता लोकांना ही कंटाळा वाटायला लागलेला आहे. मला काय ते हिंदू आणि नवे हिंदूत्वाबद्दल कळत नाही पण नवीन शिवसेना आहे, असे मला वाटते. ही नवीन शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली देऊन काँग्रेसच्या मांडीवर बसली आहे. हिंदू आहे की नाही माहिती नाही पण नवीन शिवसेना नक्की आहे, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.
दरम्यान, दोन वर्ष झाली किती वेळा म्हणणार मला मुख्यमंत्री व्हायचे नव्हते, आता मुखवटा काढा आणि तुमची महत्त्वाकांक्षा मुख्यमंत्री बनण्याची होती हे मान्य करा. सरकार पाडून दाखवा हे रोज म्हणतात. ज्या दिवशी पडेल ते कळणारही नाही. आम्हाला सध्या त्यात रसही नाही. कामे करून दाखवा, शेतकऱ्यांची मदत करा, तुमच्या हाती सत्ता आहे तुम्ही मदत करून दाखवा. मुख्यमंत्री जे बोलले त्यावरून फ्रस्ट्रेशन दिसून येते. जनतेने भाजपला नाकारले नाही. काँग्रेस शिवसेनेला नाकारले आहे, असा पलटवार भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला.