“सत्ता द्या, विजेशिवाय कृषीपंप चालणारे उपकरण देईन”; व्हिडिओ शेअर करत मनसेचा उद्धव यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2022 12:53 PM2022-03-18T12:53:15+5:302022-03-18T12:54:28+5:30
या उपकरणाद्वारे विजेशिवाय शेतकरी कृषीपंप चालवू शकतील, असा दावा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केला होता.
मुंबई: गेल्या अनेक महिन्यांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारवर नानाविध मुद्द्यांवरून विरोधक टीका करताना दिसत आहे. यात मनसेही मागे नाही. मनसेकडूनही राज्यातील अनेक मुद्द्यांवरून महाविकास आघाडीवर निशाणा साधताना दिसत आहे. यातच आता मनसेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचा एक जुना व्हिडिओ शेअर करत टीकास्त्र सोडले आहे.
आताच्या घडीला शेतकऱ्यांच्या वीज तोडणीचा मुद्दा ऐरणीवर येताना दिसत आहे. ठाकरे सरकारने दिलेले आश्वासन पाळले नाही, असा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. अशातच आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा जुना व्हिडिओ शेअर करत त्यांच्या जुन्या आश्वासनाची आठवण करून दिल्याचे सांगितले जात आहे.
शेतकऱ्यांना एक विशिष्ट उपकरण देण्याचे आश्वासन
संदीप देशपांडे यांनी ट्विट केलेल्या एका व्हिडिओमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे एका प्रचारसभेत व्यासपीठावरून भाषण करताना दिसत आहेत. हा जुना व्हिडिओ वाटत असला, तरी नेमका कधीचा किंवा कोणत्या निवडणुकांपूर्वीचा आहे, याविषयी माहिती देण्यात आलेली नाही. हा व्हिडिओ असून त्यात उद्धव ठाकरे शेतकऱ्यांना एक विशिष्ट उपकरण देण्याचे आश्वासन देताना दिसत आहेत. या ट्विटला संदीप देशपांडे यांनी बुरा ना मानो होली है, असे कॅप्शन दिले आहे.
विजेशिवाय कृषीपंप चालणारे उपकरण देईन
या व्हिडिओमध्ये, अनेक ठिकाणी विहिरीला पाणी असते, पण वीज नसते म्हणून तुम्ही ते पाणी पिकाला देऊ शकत नाहीत. मला सत्ता द्या, मी तुमच्यासाठी एक उपकरण तयार ठेवले आहे. वीज तर देईनच. पण जोपर्यंत वीज देता येणार नाही, तोपर्यंत ते उपकरण तुम्हाला देईन. ते उपकरण तुमच्या बैलाच्या सहाय्याने चालेल. त्यातून जी वीज निर्माण होईल ती या विजेच्या शिवाय तुमचा कृषीपंप चालवू शकेल. वीज नसताना देखील तुम्ही तुमच्या पिकाला त्या पंपाच्या माध्यमातून पाणी देऊ शकाल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणताना दिसत आहेत.