Dasara Melava: “विचारही नाही आणि सोनंही नाही”; उद्धव ठाकरेंच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर मनसेची टीका
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2022 08:47 AM2022-10-06T08:47:34+5:302022-10-06T08:48:47+5:30
Dasara Melava: भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो. बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असा टोला मनसेने लगावला आहे.
मुंबई: शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) या दोन्ही गटाचा दसरा मेळावा (Dasara Melava) दणक्यात झाला. शिवाजी पार्क आणि बीकेसी या दोन्ही ठिकाणी मोठ्या प्रमाणात शक्तिप्रदर्शन करण्यात आले. उद्धव ठाकरेंनी शिवतीर्थावरून केलेल्या टीका, आरोपांना एकनाथ शिंदे यांनी बीकेसीवरून प्रत्युत्तर दिले. यातच उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून मनसेकडून प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली असून, दसरा मेळाव्यावरून निशाणा साधण्यात आला आहे.
एकीकडे उद्धव ठाकरेंचे भाषण सुरु असताना दुसरीकडे बीकेसीवरून मैदानामधील एकनाथ शिंदेंच्या सभेमध्ये शिंदे गटातील खासदार राहुल शेवाळे यांनी राज ठाकरे हे शिवसेना सोडून बाहेर पडल्यानंतर त्यांच्या घरावर मोर्चा नेण्याचे, त्यांच्याविरोधात आंदोलन करण्याचे, त्यांना शिव्या देण्याचे आदेश ‘मातोश्री’वरुन आले होते, असा खळबळजनक दावा केला आहे. शिवसेना सोडून गेलेल्या छगन भुजबळ आणि नारायण राणेंबद्दलही असाच प्रकार झाल्याचा दावाही शेवाळे यांनी केला होता. उद्धव ठाकरेंचा दसरा मेळावा सुरू होण्यापूर्वी उद्धव ठाकरेंची सभा ही टोमणे सभा, असा टोला मनसे नेते आणि प्रवक्ते गजानन काळे यांनी लगावला होता. त्यानंतर दसरा मेळावा झाल्यानंतर आता मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
विचारही नाही आणि सोनंही नाही
उद्धव ठाकरे यांच्या भाषणानंतर लगेचच ट्वीटरवरुन “नुसतीच ‘उणी’ ‘धुणी’ ‘नळ’ आणि ‘भांडण’; विचार ही नाही आणि सोनं ही नाही, असे ट्वीट देशपांडे यांनी केले. तसेच उद्धव ठाकरे यांच्या जुन्या मुलाखतीचा एक व्हिडिओ ट्विट करत संदीप देशपांडे यांनी, भूतकाळ कधीच पिच्छा सोडत नसतो. बरोबर ना उद्धवजी, असा सवाल करत, बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले, असे म्हणत टोला लगावला आहे. या व्हिडिओमध्ये उद्धव ठाकरेंना एका मुलाखतीत घराणेशाहीबद्दल प्रश्न विचारण्यात आला आहे. यावर उत्तर देताना, घराणेशाहीकडे आपण कोणत्या नजरेने पाहता, ते महत्त्वाचे आहे. जर कुटुंबातील कोणी सदस्य जबरदस्तीने जनतेवर लादला जात असेल, तर ती घराणेशाही ठरू शकते. जनतेने मान्य केले असेल, तर ती बाब वेगळी. आमचे सरकार आल्यावर माझ्या मुलाला मी सांगितले की, तू मुख्यमंत्री हो किंवा अमूक खात्याचा मंत्री हो, तर ती नक्कीच घराणेशाही आहे, असे उद्धव ठाकरेंनी उत्तर दिले आहे.
दरम्यान, भाजप नेते आणि आमदार अतुल भातखळकर यांनीही उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. सर्वस्व गमावलेल्या माणसाचा थयथयाट... बापाच्या नावाने थापा. अरे हाच खरा थापा आहे... पण त्या आधी वाफा आहे.. कोण बोलतेय, उद्धव ठाकरे की राहुल गांधी? तीच बिनडोक भाषा... दसरा मेळाव्यात बोलताना, आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांना सोबत घेऊन हिंदुत्व व्यापक केले, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते, यावर शिल्लक सेनेच्या सरबरीत हिंदुत्वाचे गुपित अखेर उघड झाल्याचे ट्विट अतुल भातखळकर यांनी केले आहे.
बोले जैसा चाले त्याची वंदावी पाऊले pic.twitter.com/UgmeB1VjOb
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) October 6, 2022
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"