“आता काही लोक जेलमध्ये सकाळच्या पत्रकार परिषदेसाठी परवानगी मागतील”; मनसेचे सूचक ट्विट
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 11:06 AM2022-03-13T11:06:37+5:302022-03-13T11:07:34+5:30
मनसेने पुन्हा एकदा संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील अनेक नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणा कारवाई करीत आहेत. याविरोधात शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सातत्याने केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. भाजप नेतेही याला प्रत्युत्तर देत आहेत. यातच आता मनसेने एक ट्विट केले असून, यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात चर्चांना सुरुवात झाल्याचे सांगितले जात आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, हे ट्विट सूचक असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या ट्विटमधून संजय राऊत यांचे नाव न घेता टीका करण्यात आली आहे. तसेच संदीप देशपांडे यांनी नवाब मलिक यांचाही उल्लेख न करता त्यांच्यावर निशाणा साधला आहे. संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, जेलमध्ये गेल्यावर काही लोक घरच जेवण मागतात काहीना पुस्तक लागतात, काहीना औषध लागतात, या पुढे काही लोक जेलमध्ये सकाळची पत्रकार परिषद घ्यायची परवानगी मागतील, असे सूचक ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे.
‘सामना कार’ आता रशिया-युक्रेनमध्ये मध्यस्थीसाठी रवाना
यापूर्वीही संदीप देशपांडे यांनी संजय राऊत यांच्यावर ट्विटरच्या माध्यमातून टीका केली होती. उत्तर प्रदेश आणि गोव्याच्या घवघवीत यशा नंतर "सामना कार"रशिया आणि युक्रेन मध्ये मध्यस्थी साठी रवाना. "झुकेगा नहीं साला", असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले होते.
दरम्यान, सामनामधील आपल्या रोखठोक सदरातून पाच राज्यांच्या निकालाचे विश्लेषण करताना संजय राऊत यांनी केंद्रातील मोदी सरकार आणि भाजपवर निशाणा साधला. मतदार नरेंद्र मोदींकडे देशाचे नेते म्हणून पाहतो. त्यांच्या तुलनेचा नेता आज लोकांसमोर नाही. मोदी निवडणुकांकडे उत्सव म्हणून पाहतात आणि या उत्सवात लोकांना सामील करून घेतात. मग हे लोक बेरोजगारी, महागाई, कायदा-सुव्यवस्था हे प्रश्न निवडणुकांपुरते विसरून जातात, असा खोचक टोलाही संजय राऊत यांनी लगावला आहे.