Join us  

Bhavani Talwar: “ऋषी सुनक नावाने भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश, भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद” 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2022 1:50 PM

Bhavani Talwar: छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडमधून भारतात परत आणण्यासंदर्भात शिंदे-भाजप सरकार प्रयत्नशील असल्याचे सांगितले जात आहे.

Bhavani Talwar: ब्रिटनच्या पंतप्रधानपदी भारतीय वंशाचे ऋषी सुनक पंतप्रधान झाल्यानंतर देशभरात आनंद व्यक्त करण्यात आला. यानंतर आता भारत आणि ब्रिटनच्या मैत्रीचा नवा अध्याय लिहिला जाऊ शकेल, असे मत अनेक जाणकारांनी व्यक्त केले. यातच महाराष्ट्रालाही ऋषी सुनक यांच्याकडून मोठ्या अपेक्षा आहेत. याचे कारण छत्रपती शिवाजी महाराज यांची भवानी तलवार आणण्यासाठी आता राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात असल्याचे सांगितले जात आहे. असे असले तरी मनसेकडून याबाबत साशंकता निर्माण करण्यात आली आहे. 

छत्रपती शिवाजी महाराजांची तलवार २०२४ पर्यंत परत आणण्यासाठी राज्य सरकार ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्याशी चर्चा करणार असल्याचे महाराष्ट्राचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. सन २०२४ मध्ये शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्षे पूर्ण होत आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शंका उपस्थित केली आहे. 

भवानी तलवार मिळेल हा भोळा आशावाद

संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले आहे. यामध्ये, भवानी तलवार भारतात आणणार  हे बाबासाहेब  भोसले मुख्यमंत्री होते तेव्हां  पासून  ऐकतोय.ऋषी  सुनक हे नावाने  भारतीय असले तरी मनाने पक्के ब्रिटिश आहेत .त्यामुळे लगेच आपल्याला तलवार मिळेल हा भोळा आशावाद ठरेल .पण हा "नया भारत "आहे त्यामुळे आशा कायम आहे.कधी येणार हे भवानी माताच जाणे!!, असे ट्विट करत संदीप देशपांडे यांनी भवानी तलवार आगामी काही काळात भारतात येण्याबाबत साशंकता व्यक्त केली आहे. 

दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची भवानी तलवार इंग्लंडच्या सरकारकडे त्यांच्या संग्रहालायत आहे. ही तलवार छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास सांगणारी आणि भारताचा तसेच महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे. यामुळे जनभावना लक्षात घेवून ही तलवार मोठ्या मनाने ब्रिटिश सरकारने भारताकडे सोपवली पाहिजे, असे मत भाजप खासदार उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :संदीप देशपांडेऋषी सुनकछत्रपती शिवाजी महाराजमनसे