Join us

"समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता 'कृष्णकुंज'"

By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2020 12:21 PM

MNS Raj Thackeray And Sandeep Deshpande : राज ठाकरेंकडे येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस अधिक वाढत असून मनसेकडून समस्या मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे.

मुंबई – गेल्या अनेक दिवसांपासून मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे निवासस्थान "कृष्णकुंज" हे सर्वसामान्य जनतेसाठी समस्या मांडण्याचं एक ठिकाण बनलं आहे. राज दरबारी मांडलेली समस्या तात्काळ निकाली लागत असल्याचं चित्रही समोर येत आहे. त्यामुळे राज ठाकरेंकडे येणाऱ्या लोकांची गर्दी दिवसेंदिवस अधिक वाढत असून मनसेकडून समस्या मार्गी लागतील अशी आशा लोकांना आहे. यावरूनच मनसे नेते संदिप देशपांडे यांनी राज्य सरकारला सणसणीत टोला लगावला आहे.

मनसे नेते संदिप देशपांडे यांनी सोमवारी (16 नोव्हेंबर) आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. ठाकरे सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. "समस्या अनेक उपाय एक, महाराष्ट्राच्या मंत्रालयाचा नवीन पत्ता "श्री राजसाहेब ठाकरे कृष्णकुंज शिवाजी पार्क दादर मुंबई 28" असं ट्विट संदिप देशपांडे यांनी केलं आहे. काही दिवसांपूर्वी राज ठाकरेंच्या कृष्णकुंज निवासस्थानी वारकरी, कोळी बांधव आणि मुंबई ठाणे ब्रास बॅन्ड असोसिएशनच्या लोकांनी गर्दी केली, कोरोनामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे, यात मंदिर उघडण्याची परवानगी अद्यापही सरकारने दिली नाही, कार्तिकी एकादशी जवळ आल्याने पंढरपूर मंदिर सुरु करावं अशी मागणी वारकऱ्यांनी केली होती. 

 कोळी बांधव, वारकरी अन् ब्रास ब्रॅन्ड पथक विविध समस्या घेऊन ‘कृष्णकुंज’च्या राज दरबारी

राज ठाकरेंनी ही समस्या सरकारकडे मांडावी यासाठी मनसेने पुढाकार घ्यावा असं राज ठाकरेंना विनंती करण्यात आली होती. तेव्हा एकादशी निमित्त वारकरी जमले तर गर्दी होणार नाही का? त्यासाठी काय उपाययोजना करायल्या हव्या असं राज ठाकरेंनी शिष्टमंडळाला विचारलं होतं. मुंबईतल्या कोळी बांधवांनी गावठणाची जमीन मालकीवर दिली जात नाही अशी तक्रार घेऊन राज ठाकरेंना भेट घेतली आहे.

सात-आठ महिन्यापासून लग्न व्यवसायाचे कंबरडे मोडले आहे, मोठमोठे उत्सव, लग्न समारंभ बंद असल्याने ब्रास ब्रँन्ड व्यवसायिक अडचणीत आले आहेत, सगळीकडे अनलॉक करत असताना आमच्यावर बंदी का असं सवाल ब्रास बँन्ड पथकाने विचारला आहे, राज ठाकरेंकडे आमच्या समस्या मांडल्याने त्या सुटतील असा विश्वास या लोकांनी व्यक्त केला आहे.

टॅग्स :संदीप देशपांडेमहाराष्ट्रमनसेराज ठाकरेसरकार