Maharashtra Politics: आगामी महापालिका निवडणुका आणि आताची अंधेरी पूर्वची पोटनिवडणुकीवरून शिवसेना आणि भाजप-शिंदे गटातील संघर्ष दिवसेंदिवस अधिक तीव्र होताना दिसत आहे. यातच मनसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला डिवचले आहे. मनसे नेते संदीप देशपांडे यांनी उद्धव ठाकरेंना एक पत्र लिहून अनेक प्रश्न उपस्थित करत सडकून टीका केली होती. त्यानंतर आता एक ट्विट करून पुन्हा एकदा शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीवरून राजकीय घडामोडींन वेग आला आहे. शिंदे गट-भाजपकडून मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उद्धव ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके या निवडणुकीच्या रिंगणात आहेत. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून भाजपला ही निवडणूक न लढण्याचे आवाहन केले आहे. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनीही ही निवडणूक बिनविरोध करावी असे म्हटले. या एकूणच घडामोडींच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांनी ट्विट केले आहे.
“कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा”
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना उद्देशून केलेल्या ट्वीटमध्ये संदीप देशापांडे म्हणतात, राजसाहेब एक म्हण आठवली “कपटी भावा पेक्षा दिलदार शत्रू बरा”. तत्पूर्वी, महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार साहेबांनी दाखवला, शिवसेना कुटुंबाकडून आभार, अशा मथळ्याखाली उद्धव ठाकरे यांनी शरद पवारांना पत्र लिहिले आहे. राजकीय जीवनात अनेक वर्ष निष्ठेने पक्षाचे कार्य करणाऱ्या कार्यकर्त्याचे अचानक आपल्यातून निघून जाणे, हे प्रचंड वेदना देणारे असते. यामुळे पक्षाची हानी तर होतेच. परंतु त्यांच्या कुटुंबीयांची अपरिमित हानी होते. स्वर्गीय रमेश लटकेंच्या अचानक जाण्याने लटके आणि शिवसेना कुटुंबावर असाच दु:खाचा डोंगर कोसळला. नियमाप्रमाणे पोटनिवडणूक लागली आणि शिवसेनेने ऋतुजा लटके यांना उमेदवारी देण्याचा निश्चय केला, असे उद्धव ठाकरे यांनी आपल्या पत्रात म्हटले आहे.
शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील
ऋतुजा लटके यांना निवडणुकीपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न दुर्दैवाने विरोधकांकडून झाला. मात्र, न्याय देवतेने न्याय दिला. वास्तविक महाराष्ट्राचे राजकारण एका उच्च संस्कृती आणि मूल्यांवर आधारलेले आहे. त्याची जपणूक शिवसेनेने सदैव केली. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे, आर. आर पाटील, भाजपाच्या गिरकर ताई, यांच्या दुर्दैवी निधनानंतर शिवसेनेने महाराष्ट्राच्या संस्कृतीला अनुसरुन संबंधित पोटनिवडणुकीत शिवसेनेचा अधिकृत उमेदवार दिला नाही.ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पत्रकार परिषदेत जे मुद्दे मांडले आहेत, ते कौतुकास्पद आहेत. त्यातून शरद पवारांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या संस्कृतीचा वारसा पवार दाखवला. त्यासाठी शिवसेना कुटुंब त्यांची सदैव आभारी राहील, असे उद्धव ठाकरे आपल्या पत्रात म्हणतात.
दरम्यान, यशवंतराव चव्हाण, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, विलासराव देशमुख, प्रमोद महाज आणि शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या संस्कृतीला अधिक उंचीवर नेण्याचे काम केले आहे. ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचं राजकारण अधिकाधिक नैतिक मूल्ये आणि संस्कृतीला जपण्याचे कार्य करेल, अशी मला खात्री आहे. असे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"