MNS Sandeep Deshpande News:उद्धव ठाकरे हे सोडून गेलेल्या आमदारांच्या जीवावर विधान परिषदेचे आमदार झाले. एवढा स्वाभिमान असेल, तर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि परत निवडणूक लढवून दाखवावी. संजय राऊतही याच सोडून गेलेल्या खासदारांच्या जीवावर राज्यसभेवर गेले. त्यांनीही राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा द्यावा आणि लोकसभा लढवावी. संजय राऊतांमध्ये तेवढी हिंमत आहे का, असे थेट आव्हान मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिले आहे.
मीडियाशी बोलताना संदीप देशपांडे म्हणाले की, राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका महाराष्ट्राच्या आणि देशाच्या हिताची आहे. ज्या लोकांना फक्त स्वतःचा स्वार्थ कळतो. त्यांना या गोष्टी कळणार नाही. ज्यांनी स्वतःच्या भावाचे नगरसेवक फोडले, त्यांना त्यागाच्या गोष्टी काय कळणार, असा सवाल करत आता ते ज्या आघाडीत गेले आहेत, तिथेही काँग्रेसची जागा ओरबाडून खाल्ली. ज्यांचे आयुष्य दुसऱ्याचे ओरबाडण्यात गेले, त्यांनी आम्हाला काय शिकवावे, असा सवाल संदीप देशपांडे यांनी ठाकरे गटाला उद्देशून केला. मनसेच्या गुढी पाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांनी महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. तसेच लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी घोषणा करून मनसैनिकांनी आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागावे, असे आदेश राज ठाकरे यांनी दिले. यानंतर राज ठाकरेंवर झालेल्या आरोप आणि टीकेचा संदीप देशपांडे यांनी खरपूस शब्दांत समाचार घेतला.
उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्यात हिंमत नाही
तुम्हाला मुख्यमंत्री पद हवे होते, म्हणून तुम्ही वेगळी भूमिका घेतलीत. ते मुख्यमंत्रीपद तुम्ही शिवसैनिकांना देणार होतात. पण तेही स्वतःच्या पारड्यात पाडून घेतले. ज्यांच्यात निवडणूक लढवण्याची हिंमत नाही, त्यांनी आम्हाला शिकवू नये, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली. एकाही जागेची बार्गेनिंग न करता आम्ही पाठिंबा देतो, असे म्हणायला खूप हिंमत लागते. त्यागाची भावना लागते. महाराष्ट्राचा आणि देशाचा विचार करणारा माणूसच हे करू शकतो. ती उंची ना उद्धव ठाकरेंची आहे, ना संजय राऊतांची आहे, या शब्दांत संदीप देशपांडे यांनी हल्लाबोल केला.
दरम्यान, स्वतः किती पलट्या मारल्या आहेत, हे उद्धव ठाकरेंनी पाहावे. २०१९ ला भाजपासोबत युती करून तुम्ही निवडणुका लढल्या. निवडून भाजपासोबत आलात आणि सत्ता काँग्रेससोब स्थापन केली. शरद पवारांबद्दल उद्धव ठाकरे जे काही बोलले आहेत, त्याचेही व्हिडिओ आहेत. कोरोना काळात घरात बसून फक्त फेसबुक लाइव्ह केले. राज ठाकरे यांच्याकडे अनेक लोक कोरोना काळात भेटायला आले. आम्ही रस्त्यावर उतरून काम केले आहे. यांनी आम्हाला शिकवू नये. आम्हाला नीतिमत्ता कळते, या शब्दांत संदीप देशपांडे यांनी निशाणा साधला.