Join us  

Maharashtra Politics: “राष्ट्रीय पक्ष शी.ऊ.बा.ठा गुजरात निवडणूक लढणार की उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर माघार घेणार?”

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2022 11:52 AM

Maharashtra Politics: गुजरात विधानसभेची निवडणूक जाहीर होताच मनसेने शिवसेनेच्या ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे.

Maharashtra Politics: केंद्रीय निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. गुजरातची निवडणूक दोन टप्प्यात होणार असून, ८ डिसेंबर रोजी निकाल लागणार आहे. यंदाच्या गुजरात निवडणुकीत आम आदमी पक्ष मैदानात असून, भाजप आणि काँग्रेसला तगडे आव्हान उभे करू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. यातच गुजरात विधानसभा निवडणुकीवरून मनसेने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला खोचक टोला लगावला आहे. 

गुजरात आणि हिमाचल प्रदेशमध्ये निवडणुकीची रणधुमाळी सुरु झालेली असताना दिल्लीतही महापालिका निवडणुकीचा बिगुल वाजण्याची शक्यता आहे. हिमाचल प्रदेशमध्ये आपने एवढी ताकद लावलेली नसली तरी गुजरातमध्ये केजरीवालांनी मोठी फिल्डिंग लावण्यास सुरुवात केली आहे. सध्याच्या ओपिनिअन पोलनुसार आपला ५० ते ६० जागा मिळण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी ट्विट करत शिवसेनेच्या ठाकरे गटाला टोला लगावला आहे. 

उत्तर प्रदेशच्या भव्य यशानंतर माघार घेणार??? 

शिवसेनेने आता राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करण्यासंदर्भात रणनीति आखली आहे. उत्तर प्रदेश, गोवा विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवण्यात आली होती. मात्र, या दोन्ही निवडणुकीत शिवसेनेला दणकून पराभव स्वीकारावा लागला. यावरून संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला डिवचले आहे. राष्ट्रीय पक्ष म्हणून वाटचाल करणारी  शी. ऊ.बा. ठा या वेळेला गुजरात निवडणूक लढवणार ?की उत्तर प्रदेश च्या भव्य यशा नंतर माघार घेणार???, असे ट्विट संदीप देशपांडे यांनी केले आहे. 

दरम्यान, गुजरात विधानसभा निवडणुकीचे बिगुल अखेर वाजले असून राज्यातील १८२ मतदार संघांसाठी निवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. गुजरातमध्ये एकूण दोन टप्प्यात मतदान होणार असून, पहिल्या टप्प्यातील मतदान १ डिसेंबर मतदान होणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान ५ डिसेंबर रोजी होईल. मतमोजणी ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :उद्धव ठाकरेगुजरात