Join us

"...तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल"; वरळी हिट अँड रनवरून इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 09, 2024 9:34 AM

MNS Sandeep Deshpande And Worli Hit And Run : मनसेचे नेते संदिप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे.

वरळीतील हिट अँड रन प्रकरणातील आरोपी मिहीर शहा याने अपघातानंतर कार वांद्रे, कलानगर परिसरात सोडली आणि  वडील राजेश शाह यांना फोन करून घटनाक्रम सांगितला. त्यानंतर त्याने आपला मोबाइल बंद केल्याची माहिती पुढे येत आहे. तो सकाळी ८ वाजेपर्यंत गोरेगावमध्ये प्रेयसीच्या घरी थांबला. बातम्या सुरू होताच तेथून मित्राच्या घरी जातो सांगून निघाला. पोलिसांनी त्याच्या प्रेयसीचाही जबाब नोंदवला आहे. 

अपघातग्रस्त वाहन तपासणीसाठी आरटीओ आणि फॉरेन्सिक पथकाला बोलावण्यात आले आहे. पोलीस मिहीरचा ठावठिकाणा शोधत आहेत. याच दरम्यान मनसेने देखील आंदोलनाचा इशारा दिला आहे. "आज संध्याकाळपर्यंत जर आरोपीला अटक झाली नाही तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी" असं म्हटलं आहे. मनसे नेत्याने हा इशारा दिला आहे. 

मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. "वरळी येथील झालेल्या हिट अँड रन घटनेला ४८ तास उलटून गेले आहेत पण अजूनही मुख्य आरोपी मिहीर शहा फरार आहे. आज संध्याकाळपर्यंत जर आरोपीला अटक झाली नाही तर मनसे वरळी पोलीस स्टेशन बाहेर धरणे आंदोलन करेल याची प्रशासनाने नोंद घ्यावी" असं संदिप देशपांडे यांनी म्हटलं आहे. 

वरळीत घडलेल्या हिट अँड रनप्रकरणी राजकीय हस्तक्षेप न करता आरोपीवर कारवाई करावी, अशी मागणी उद्धवसेनेचे आमदार आणि युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी केली. या प्रकरणातील राजेश शाह कोण आहे, याची तुम्ही माहिती घ्या, मी या घटनेला राजकीय रंग देणार नाही. कोणी कोणत्याही पक्षात असले तरी मी या घटनेला राजकीय वळण देणार नाही. या घटनेत राजकीय हस्तक्षेप नको, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. 

‘हिट अँड रन’च्या प्रकारानंतर आदित्य यांनी वरळी पोलीस ठाण्यात जाऊन माहिती घेतली. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना म्हणाले की, "या घटनेतील आरोपी चालक फरार झाला आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. त्याला लवकरात लवकर अटक करून कठोर शिक्षा करावी, अशी आमची मागणी आहे." 

"उलट दिशेने गाड्या चालवणे, सिग्नल न पाळणे, ट्रिपल सीट जाणे हे प्रकार मुंबईत वाढले आहेत. ते आधी नव्हते. पण आता तर  हिट अँड रनसारखे प्रकार घडत आहेत, अशा घटना घडू न देणे गरजेचे आहे. त्यासाठी राजकारणाच्या पलीकडे जाऊन परिस्थिती सुधारावी लागेल. मुंबईच्या वाहतुकीत शिस्त आणि सुरक्षा आणावी लागेल" असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.  

टॅग्स :संदीप देशपांडेमनसेमुंबईपोलिस