Sandeep Deshpande: "तुम्ही बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवायला निघालात", संदीप देशपांडे यांचा घणाघात
By ऑनलाइन लोकमत | Published: April 12, 2022 07:17 PM2022-04-12T19:17:30+5:302022-04-12T19:42:54+5:30
Sandeep Deshpande: "हनुमान चालिसा लावल्यावर राग येत असेल तर भगवा रंग बाजुला ठेवून दुसरा रंग परिधान करा."
ठाणे: आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची उत्तरसभा आयोजित करण्यात आली. यावेळी मनसे नेते संदीप देशपांडेंनी(Sandeep Deshpande) शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केला. आदित्य ठाकरेंनी मनसेचा संपलेला पक्ष म्हणून उल्लेख केला होता. त्यावर बोलताना देशपांडे म्हणाले की, "आम्ही संपलो नाहीत, तुम्हीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे विचार संपवायला निघालात. हनुमान चालिसा लावल्याने का डिवचले जाता? आम्हाला संपलेला पक्ष म्हणता, पण तुम्हीच शिवसेनाप्रमुखांचे विचार संपवले. येत्या महापालिका निवडणुकीत तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ."
"हनुमान चालिसेचा शिवसेनेला राग"
ते पुढे म्हणाले की, "रामनवमीला मनसेकडून रामरथ तयार करण्यात आला होता. हा रथ आम्ही सगळीकडे घेऊन जाणार होतो, चांगल्या भावनेने हा रथ बनवला होता. मुंबईतल्या गडकरी चौकात या रथाचे पूजन केले. पण, लगेच पोलीस पाठवले आणि रामरथ जप्त केला. आमच्या नेत्यांना आत नेले. मी तिकडे गेलो होतो, विचारलं काय झालं? तर, शिवसेनेला डिवचण्यासाठी तुम्ही हनुमान चालिसा लावल्याचे त्यांनी म्हटले. पण, शिवसेना हनुमान चालिसा लावल्यावर शिवसेना डिवचत असेल तर भगवा रंग बाजुला ठेवून दुसरा रंग परिधान करावा," असेही ते म्हणाले.
जितेंद्र आव्हाडांना मुंब्र्याची म्हैस म्हटले
ते पुढे म्हणाले की, "मुंब्र्याची म्हैसे म्हणते, राज साहेब दंगली भडकवू नये. तुम्ही आम्हाला शिकवणार? अफजल गुरुला फाशी दिली म्हणून रडणारे तुम्ही. रात्रीबेरात्री दगड मारता, दम असेल तर समोर येऊन दाखवा. मला एकच सांगणे आहे, महाराष्ट्र सैनिकांशी पंगा घ्ययचाच नाही. आम्ही प्रभू श्री रामचंद्रांचे सैनिक आहोत. आमच्या शेपटीला आग लावू नका, तुमची लंका जाळल्याशिवाय राहणार नाही", असा घणाघातही देशपांडे यांनी केला.
संबंधित बातमी- "त्यावेळची वसंतसेना आणि आताची शरदसेना", संदीप देशपांडेंनी सेनेला डिवचलं