मुंबई: राज्याचे हिवाळी अधिवेशन (Winter Session Maharashtra) अनेकविध मुद्यांवरून चांगलेच गाजले. सत्ताधारी महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार आणि मुख्य विरोधी पक्ष भाजप यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात भाजपने सत्ताधारी ठाकरे सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री अनुपस्थित असण्याबाबतचा मुद्दाही चांगला गाजला. यावरून अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री सभागृहात येण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र, मुख्यमंत्री उपस्थित न राहिल्याबाबत अजित पवार यांच्यावर आता टीका केली जात आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे बहुधा बनावट स्टॅम्प पेपर आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते, असा टोला लगावण्यात आला आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्रामध्ये गाजलेल्या बनावट स्टॅम्प पेपर घोटाळ्यातील बनावट स्टॅम्प पेपर बहुधा उपमुख्यमंत्र्यांकडे आला असावा, नाहीतर तोंडावर आपटले नसते. असो मुख्यमंत्री पदाचा हंगामी का होईना ताबा मिळाला त्यासाठी शुभेच्छा, असे खोचक ट्विट संदीप देशपांडे यांनी केले.
स्टॅम्पवर लिहू देऊ का?
उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या गैरहजेरीबाबत प्रश्न विचारण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी अधिवेशनाला यावे अशी आमची सर्वांचीच इच्छा होती. मी पण सुरुवातीला चहापानाच्या कार्यक्रमावेळी पत्रकार परिषदेत स्टँपवर लिहून देऊ का, असा दावा केला होता. पण कधीकधी सर्वच गोष्टी मनासारख्या होत नाहीत. गावाकडे म्हटले जाते स्टॅम्पवर लिहू देऊ का? त्यापद्धतीने मी म्हटलो होतो. पण मुख्यमंत्री आले नाहीत, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली. शेवटच्या दिवशी मुख्यमंत्री येणार होते, पण कोरोनाचे रुग्ण वाढायला लागले म्हणून मी आणि बाळासाहेब यांनी त्यांना अधिवेशनात येऊ नका, असे सांगितले. त्यांची तब्येत पूर्ण सुधारावी यासाठी आपण प्रार्थना करूया, असे अजित पवार म्हणाले.
दरम्यान, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांनी त्यांचा पदभार आदित्य ठाकरे किंवा रश्मी ठाकरे यांच्याकडे द्यावा, असे म्हटले होते. तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी फडणवीसांकडे मुख्यमंत्रीपद द्यावे असे म्हटले होते. मुख्यमंत्रीपदाच्या चार्जवरून झालेल्या टीकेलाही अजित पवार यांनी उत्तर दिले. अजित पवार म्हणाले की, चार्ज कोणाला द्यायचा हे आम्ही ठरवू बाहेरच्यानी त्यात नाक खुपसायची काही गरज नाही, असा पलटवार अजित पवारांनी केला.