“घरच नाही तर कर कुणाचा माफ करणार?”; मनसेचा मुख्यमंत्र्यांना रोकडा सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2022 10:45 AM2022-01-02T10:45:38+5:302022-01-02T10:46:51+5:30
मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपार केले. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का?
मुंबई: गेल्या अनेक दिवसांपासून आजारी असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) जनतेसमोर आले. नववर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सर्वसामान्य मुंबईकरांना मोठी भेट दिली आहे. मुंबईकरांच्या ५०० चौ.फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी जाहीर केला. यानंतर मात्र, भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी यासंदर्भात टीका केली असून, भाजपनंतर आता पाठोपाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मनसे नेते संदीप देशपांडे यांनी एक ट्विट केले असून, मुंबईकरांना ५०० चौ. फुटापर्यंतच्या घरावरील मालमत्ता कर माफ करण्याच्या निर्णयावर टीका केली आहे. संदीप देशपांडे यांनी ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोला कॅप्शन देताना, घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार, अशी विचारणा करण्यात आली आहे.
घरच नाही तर कर कुणाचा माफ करणार?
संदीप देशपांडे यांनी शेअर केलेल्या या फोटोत काही कोळी बांधव ‘आवक विभाग’ अशी पाटी लिहिलेल्या कार्यालयासमोर उभे राहून दाद मागताना दिसत आहेत. मराठी माणसाला मुंबईतून वसई-विरारला हद्दपार केले. आता भूमिपुत्राची अवस्था तीच करणार आहात का, असा प्रश्न हे कोळीबांधव विचारताना दिसत आहेत. समोरच्या कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर मुख्यमंत्र्यांसारखी दिसणारी व्यक्ती उभी असून त्यांच्या हातात ‘कोस्टल रोड मच्छिमार्केट’ असे लिहिलेली एक बॅग दाखवण्यात आली आहे. याच फोटोसह केलेल्या ट्विटला घरच नाही, तर कर कुणाचा माफ करणार, असा खोचक सवाल करणारे कॅप्शनही देण्यात आले आहे.
२०१७ मध्ये दिलेले वचन पूर्ण करत आहोत
राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईकरांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केला. यामध्ये मुंबईतील ५०० चौरस फुटांपर्यंत घरे असणाऱ्या सर्वांना मालमत्ता करांमधून सूट देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सन २०१७ मध्ये शिवसेनेने वचननामा दिला होता. त्यातील अनेक वचने पूर्ण केले आहेत. पण मुंबईकरांसाठी ५०० चौ. फूटांपर्यंत मालमत्ता कर रद्द करण्याचे वचन विचारपूर्वक दिले होते. ५०० चौ. फुटापर्यंतच्या घराच्या मालमत्ताकर माफ करणे हे महत्वाचे वचन आपण पूर्ण करत आहोत, असे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
दरम्यान, सन २०१७ चे वचन पूर्ण करण्यासाठी अखेर २०२२ हे निवडणुकीचे वर्ष उजाडले! देर आए दुरुस्त आए…! असे ट्विट करत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. देवेंद्र फडणवीसांनी या ट्विटसोबतच नुकत्याच संपलेल्या विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात या मुद्य्यावरून सभागृहात मांडलेल्या आपल्या भूमिकेचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे.