मुंबई-
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्यांबाबत घेतलेल्या आक्रमक भूमिकेनंतर कार्यकर्ते देखील आक्रमक पवित्र्यात आहेत. मशिदीवरील भोंगे उतरवले गेले नाहीत तर मशिदींसमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावण्याचा इशारा राज ठाकरेंनी दिला. त्यानंतर राज्यभर कार्यक्रर्ते आक्रमक झाले आणि पोलिसांनी कायदा व सुव्यवस्थेच्या पार्श्वभूमीवर मनसेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यास सुरुवात केली. याच संदर्भात राज ठाकरे यांच्या 'शिवतीर्थ' निवासस्थानाबाहेर मनसे नेते संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना ताब्यात घेण्यासाठी पोलीस आले होते. त्यावेळी दोघंही नेते पोलिसांना चकवा देऊन निसटले. या झटापटीत एक महिला पोलीस खाली पडली आणि जखमी झाली होती. याच घटनेच्या पार्श्वभूमीवर संदीप देशपांडे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
दुसरीकडे संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांना अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी प्रयत्न सुरू आहेत. देशपांडेंच्या अटकपूर्व जामीनावर आज कोर्टात सुनावणी होणार आहे. त्यांना आज जामीन मिळणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्या शोधासाठी मुंबई पोलिसांच्या १० टीम केल्या तैनात करण्यात आल्या आहेत. तसेच मुंबई क्राईम ब्राँचच्या ३ टीम देखील मनसेच्या या दोन्ही नेत्यांचा शोध घेत आहे. मुंबई आणि मुंबई बाहेरही या दोघांचा शोध असल्याची माहिती मिळत आहे.
देशपांडेंनी सांगितला पोलिसी प्रोटोकॉल-महिला पोलीस अधिकाऱ्याला धक्काबुक्की केल्याचा, त्यामुळे त्या पडून जखमी झाल्याचा आरोप देशपांडेवर केला जात आहे. त्यावरही त्यांनी स्पष्टीकरण दिलं. 'आम्ही तिथून निघून गेल्यावर टीव्हीवरच्या बातम्या पाहिल्या. धक्काबुक्कीत महिला पोलीस कर्मचारी जखमी झाल्याचं दाखवत होते. मात्र माझा धक्का त्या महिला पोलिसाला लागलाच नाही. फुटेजमध्ये तसं स्पष्ट दिसत आहे. माझ्याभोवती ७ ते ८ पुरुष पोलीस अधिकारी होते. पुरुष अधिकारी उपस्थित असताना एका पुरुषाला महिला अधिकारी पकडायला जात नाही, हा प्रोटोकॉल आहे,' याची आठवणही त्यांनी करून दिली होती.