मनसेच्या वरिष्ठांचा सैनिकांशी ‘संवाद’
By admin | Published: April 11, 2017 03:11 AM2017-04-11T03:11:17+5:302017-04-11T03:11:17+5:30
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पार पडलेल्या मनसेच्या वर्धापन
मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला लोकसभा, विधानसभा आणि महानगरपालिका निवडणुकांत दारुण पराभवाला सामोरे जावे लागले. त्यानंतर पार पडलेल्या मनसेच्या वर्धापन दिनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांच्या भेटी घेणार असल्याचे जाहीर केले होते. त्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून भायखळा विधानसभा क्षेत्रात मनसेच्या वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करण्यासाठी ‘संवाद’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
भायखळा पूर्वेकडील लुणावा भवन येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, शिरीष सावंत, अविनाश अभ्यंकर, संजय चित्रे, मनसेच्या सरचिटणीस रीटा गुप्ता, राजा चौगुले, राजेंद्र शिरोडकर, आदित्य शिरोडकर, सचिव प्रमोद पाटील, मनसेचे उपाध्यक्ष संजय नाईक, अरविंद गावडे असे वरिष्ठ नेते आणि पदाधिकारी उपस्थित होते. वर्धापन दिनाच्या दृष्टीने पहिले पाऊल म्हणून वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांची भेट घेतल्याचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी सांगितले.
लिपारे म्हणाले की, ‘या वेळी वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. पराभवाने खचून न जाता, पुढील निवडणुकीला सामोरे जाण्याचा सल्ला वरिष्ठ नेत्यांनी कार्यकर्त्यांना दिला. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेताना कुठे कमी पडलो आणि कमतरता भरून काढण्यासाठी भविष्यात कोणत्या उपाययोजना करता येतील? यावर चर्चा करण्यात आली.’ (प्रतिनिधी)