भायखळ्यात मनसेला धक्का, विभागाध्यक्षाने बांधले ‘शिवबंधन’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2018 02:56 AM2018-10-26T02:56:45+5:302018-10-26T02:57:10+5:30
मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर आता मनसेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन हाती बांधायला सुरुवात केली आहे.
मुंबई : मुंबई महापालिकेमध्ये शिवसेनेने मनसेचे नगरसेवक फोडल्यानंतर आता मनसेच्या नाराज पदाधिकाऱ्यांनीही शिवबंधन हाती बांधायला सुरुवात केली आहे. मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांचे निकटवर्तीय समजले जाणारे आणि भायखळा विधानसभेचे विभागाध्यक्ष विजय लिपारे यांनी गुरुवारी अखेर शिवसेनेमध्ये प्रवेश केला. लिपारे यांच्या जाण्याने मनसेला भायखळ्यात खिंडार पडल्याची चर्चा आहे.
मातोश्री येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत लिपारे यांनी पक्षप्रवेश केला. मनसेत असलेल्या अंतर्गत गटबाजीमुळे मुंबई मनपा निवडणुकीत लिपारे यांचे तिकीट कापले गेले होते. तेव्हापासून लिपारे पक्ष नेतृत्वावर नाराज होते. त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लिपारे यांची भेट घेत नाराजी दूर केली होती. पुन्हा आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी भायखळा विधानसभा मतदारसंघातून लढावे, यासाठीही लिपारे यांचे प्रयत्न सुरू होते. मात्र, वरिष्ठ पातळीवरील नेत्यांकडून कोणताही प्रतिसाद मिळत नसल्याने ते नाराज झाले होते. हीच संधी हेरत स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांनी लिपारे यांना गाठले़ ठाकरे घराण्यातच काम करणार असल्याने आनंदी असल्याची सावध प्रतिक्रिया लिपारे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली आहे. भविष्यात शिवसैनिक म्हणून पक्ष देईल ती जबाबदारी स्वीकारणार असल्याचेही त्यांनी सांगितले.