"...मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक बंड करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं"; मनसेचं टीकास्त्र
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2022 04:35 PM2022-05-18T16:35:02+5:302022-05-18T16:41:41+5:30
MNS Shalini Thackeray Slams Shivsena Deepali Sayed : शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे.
मुंबई - राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामध्ये मनसेचे पदाधिकारी यांच्यासमवेत बैठका घेणार आहेत. तसेच आगामी २१ मे रोजी राज ठाकरे यांची पुण्यात सभा होणार आहे. याबाबत देखील नियोजन करण्यात येईल अशी चर्चा सुरू आहे. राज ठाकरेंच्या या सभेपूर्वी शिवसेनेच्या नेत्या दीपाली सय्यद यांनी टोला लगावला. सभा करायच्याच असतील तर आयोध्यामध्ये करून दाखवा... पुण्यामध्ये तर शिवसेनेचे नगरसेवक पण सभा घेतात, तेही जास्त गर्दी करून, असा टोला दीपाली सय्यद यांनी राज ठाकरेंना लगावला. यानंतर आता मनसेने जोरदार हल्लाबोल केला आहे.
"राजसाहेबांना, मनसेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा..." असं म्हणत निशाणा साधला आहे. शालिनी ठाकरे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत एक ट्विट केलं आहे. "राजसाहेबांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा 'मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या' असा अग्रलेख लिहिणाऱ्या 'सामना'वीरांचा अग्रलेख वाचा. मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक 'बंड' करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं!" असं म्हणत टीकास्त्र सोडलं आहे.
राजसाहेबांना, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला फुकटचे सल्ले देण्यापेक्षा 'मुस्लिमांचा मतदानाचा अधिकार काढून घ्या' असा अग्रलेख लिहिणाऱ्या 'सामना'वीरांचा अग्रलेख वाचा. मग तुमच्यातील 'सय्यद' अचानक 'बंड' करेल किंबहुना त्याने तसं करायलाच हवं!https://t.co/ZaU413zLXS@deepalisayed
— Shalini Thackeray (@ThakareShalini) May 18, 2022
राज ठाकरेंच्या पुण्यातील दोन दिवसीय दौऱ्यात अनेक घडामोडी पाहायला मिळणार आहेत. पुण्यात मनसेची पक्षसंघटना मजबूत आहे. मात्र गेल्या महिन्यात भोंग्याच्या भूमिकेबद्दल घेतलेल्या भूमिकेवरून वसंत मोरे यांना शहराध्यक्षपदावरून काढल्यानंतर पुण्यामध्ये मनसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये धुसफूस पाहायला मिळतेय. त्यावर या दौऱ्यामध्ये पडदा पडण्याची शक्यता आहे. पुण्यातील निवडणुका यासंदर्भात देखील महत्त्वाच्या जबाबदाऱ्या वाटप होण्याची शक्यता आहे. तसेच यानिमित्ताने महत्त्वाची पत्रकार परिषद देखील पार पडण्याची शक्यता आहे.
भोंग्याच्या मुद्द्यावरून वसंत मोरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर त्यांना अध्यक्ष पदावरून हटवण्यात आले. भोंग्याच्या आंदोलनातही मोरे सहभागी नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे विविध चर्चाना उधाण आले. पुण्यात रविवारी पुणे शहर अध्यक्ष साईनाथ बाबर यांच्या अध्यक्षतेखाली मनसे कोअर कमिटीच्या पदाधिकार्यांसहित मेळावा आयोजित केला होता. त्या कोअर कमिटीच्या निमंत्रण पत्रिकेत वसंत मोरे यांचे नाव नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती. मला पक्षातून डावललं जातंय असं मोरे म्हणाले होते. उद्या राज ठाकरे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यांनी वसंत मोरे यांना फोन करून बोलावलं आहे, या रविवारी झालेल्या मेळाव्यासंदर्भात झालेल्या बैठकीचा आढावा घेणार असल्याची माहिती मिळत आहे.