MNS News: मुंबईच्या मुलुंड परिसरात मराठी माणसाला जागा नाकरण्याचे प्रकरण ताजे असतानाच आता कांदिवली येथे एका मराठी माणसाच्या जागा हडप करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे समोर आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी तातडीने पावले उचलत याविरोधात पोलिसांत धाव घेतली. या घटनेबाबत मनसेकडून एक्सवर एक पोस्ट शेअर करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली परिसरात BMC मधून निवृत्त झालेल्या एका महिला अधिकाऱ्याची जागा हडपण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबतची व्यथा मांडणारा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला होता. मनसेकडून याची दखल घेण्यात आली आणि पदाधिकारी दिनेश साळवी आणि त्यांच्या टीमने तत्काळ पावले उचलत पोलिसांकडे धाव घेतली.
सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना!
बीएमसीमधून निवृत्त झालेल्या महिला अधिकाऱ्याचे नाव रीटा दादरकर असून, त्यांच्या प्रॉपर्टीवर गुजराती माणसाने डल्ला मारण्याचा प्रयत्न केला. याबाबत एका व्हिडिओतून रीटा दादरकर यांनी आपली व्यथा मांडली. बोरिवली, कांदिवली येथे १९४४ पासून आमच्या प्रॉपर्टी आहेत. स्वातंत्र्यापूर्वीपासूनच्या या जागा आहेत. आजच्या घडीला परमार नामक व्यक्तीने यावर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. इलेक्ट्रिक मीटर तोडला आहे. आत माणसे घुसवली. त्याचा व्हिडिओ आहे. पोलीस मात्र काहीच ठोस अॅक्शन घेत नाहीत. मराठी माणसाने खरोखरच जगायचे आहे की नाही, हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांना विचारण्याची वेळ आली आहे. पोलीस यंत्रणा योग्य काम करणार नसेल तर, त्यांची काही गरज नाही. त्यांना मिळणारा पैसा आमच्या करातून मिळत आहे. असे ऐकिवात आहे की, पोलिसांना सेट केले आहे. अशाने एकाही मराठी माणूस मुंबईत राहणार नाही. मला मनसेने मदत करण्याचा खूप प्रयत्न केला. हा प्रश्न साधा नाही. प्रत्येक ठिकाणी मराठी माणसावर अन्याय होईल आणि प्रत्येक ठिकाणी राज ठाकरेंची माणसे मदतीला धावतील. असे असेल तर पोलीस कशाला हवेत, सगळी यंत्रणा राज ठाकरे यांच्याकडेच द्या ना, असे रीटा दादरकर यांनी एका व्हिडिओत म्हटले आहे.
दरम्यान, चारकोप परिसरातील या घटनेची दखल घेत दिनेश साळवी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने हालचाल करत मदतीला पोहोचले. पोलिसांनी कारवाई केली नाही, तर मनसे आंदोलन करेल. या प्रकाराला मनसे स्टाइलने उत्तर दिले जाईल. मनसे शांत बसणार नाही. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मुंबईत चाललेल्या प्रकारावर लक्ष द्यायला हवे, अशी ठाम भूमिका दिनेश साळवी यांनी घेतली. यानंतर पोलिसांनी FIR नोंदवण्यास तयारी दाखवली असून, या प्रकरणी पुढे काय होते, याकडे लक्ष लागले आहे.