VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2024 08:28 AM2024-12-11T08:28:05+5:302024-12-11T08:29:34+5:30

कुर्ला अपघाताची घटना ताजी असतानाच अंधेरीत बस चालकाने गाडी रस्त्यात थांबवून मद्य खरेदी केल्याचा प्रकार समोर आला आहे.

MNS shares video of BEST bus driver stopping bus at wine shop to buy liquor in Andheri | VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद

VIDEO: बस वाईन शॉपवर थांबवून दारु घेतली अन्... BEST चालकाचा प्रताप कॅमेरात कैद

BEST Bus Driver Viral Video : कुर्ला पश्चिमेच्या एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी रात्री घडलेल्या भीषण बेस्ट बस दुर्घटनेतील सात जणांचा मृत्यू झाला असून ४२ जखमींना विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले आहे. बेस्टची इलेक्ट्रिक बस अनियंत्रित झाल्यानंतर थेट वर्दळीच्या भागात शिरली आणि वाहनांना आणि पादचाऱ्यांना चिरडत गेली. याप्रकरणी कंत्राटी चालक असलेल्या संजय मोरे (५४) याला अटक करण्यात आली आहे. आरटीओ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मानवी चूक आणि  योग्य प्रशिक्षणाचा अभाव यामुळे हा जीवघेणा अपघात झाल्याचा संशय आहे. हे प्रकरण ताजं असतानाच मुंबईतून आणखी एक धक्कादायक व्हिडीओ समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बेस्ट बसचा चालक चक्क बस थांबवून दारू घेत असल्याचे दिसत आहे.

कुर्ला बेस्ट बस अपघातानंतर प्रवासी आणि पादाचाऱ्यांमध्ये सध्या भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे. कंत्राटी कामगाराच्या चुकीमुळे सात जणांचा बळी गेल्यामुळे बेस्ट प्रशासनावर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. कुर्ला अपघाताच्या प्रकरणाला २४ तास उलटत नाही तोच आणखी एक धक्कादायक व्हिडीओ अंधेरी भागातून समोर आला आहे. व्हिडीओमध्ये बसचा चालक प्रवाशांनी भरलेली बस भररस्त्यात थांबवून वाईन शॉपमध्ये जाताना दिसत आहे. त्यानंतर दारु खरेदी केल्यानंतर बसचा चालक बस चालवत नेताना दिसत आहे.

मुंबईच्या अंधेरी पश्चिमेत ओशिवरा भागात बेस्ट बस चालकाकडून वाईन शॉपवर बस थांबवून दारू घेताना मनसेकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. मनसे वर्सोवा विधानसभा विभाग अध्यक्ष संदेश देसाई यांनी बेस्ट बस चालकाचा दारू घेताना व्हिडिओ त्यांच्या सोशल मिडिया अकाऊंटवरुन शेअर केला आहे. बेस्टच्या बस चालकाने गाडी थांबवली आणि तो दारू घ्यायला वाईन शॉपवर गेला. दारू घेऊन तो परत आला आणि पुन्हा चालकाच्या सीटवर बसल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे.

"बेस्टचे ड्राईव्हर मुंबईकरांचा काळ बनतायत. सरकार मात्र फक्त मृतांना मदत जाहीर करतंय,पण दारू पिऊन बस चालवणाऱ्या या बेस्ट चालकांचं काय करणार?," असा सवाल संदेश देसाई यांनी केला आहे.

दरम्यान, कुर्ला पश्चिमेच्या एस. जी. बर्वे मार्गावर  बेफाम बस चालवून अपघातास कारणीभूत ठरलेला बेस्टचा कंत्राटी चालक संजय मोरे याला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्याखाली अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला २१ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. अपघातग्रस्त बसचा चालक संजय मोरे हा कंत्राटी चालक आहे. त्याला इलेक्ट्रिक बस चालविण्याचा फारसा अनुभव नव्हता, अशी माहिती पोलिसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आली आहे. मोठी इलेक्ट्रिक बस चालविण्याचे केवळ तीन दिवसांचे प्रशिक्षण घेतल्यानंतर १ डिसेंबरपासून त्याला ही बस चालवण्याची जबाबदारी देण्यात आली होती.  

Web Title: MNS shares video of BEST bus driver stopping bus at wine shop to buy liquor in Andheri

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.