Join us

मनसेनं महाआघाडीत यावं, पण...; अजित पवारांनंतर धनंजय मुंडेंचंही आमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2019 8:00 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचा कुठलाही विचार नाही. राज आणि मी भेटतो, याचा अर्थ आम्ही पक्ष म्हणून एकत्र येणार असा होत नाही.

मुंबई - मनसेला आघाडीमध्ये घ्यावं की घेऊ नये यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये संभ्रमावस्था कायम आहे. असे असतानाच माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी मनसेने आघाडीसोबत यावे, असे आवाहन केले होते. त्यानंतर, राष्ट्रवादीचे दुसरे दमदार नेते आणि विधानपरिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनीही मनसेला सोबत घेण्याच अडचण नसून हे माझे वैयक्तिक मत असल्याचं म्हटले आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीपूर्वी मनसे काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्ये सहभागी होणार का याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगली आहे. 

राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मनसेला सोबत घेण्याचा कुठलाही विचार नाही. राज आणि मी भेटतो, याचा अर्थ आम्ही पक्ष म्हणून एकत्र येणार असा होत नाही. तर, ती भेट वेगवेगळ्या विषयांवर चर्चा असते, असे पवार यांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. मात्र, त्यानंतर मनसेला आघाडीत घेण्याबाबत विचारणा केली असता अजित पवार यांनी प्रतिसाद दिला. ''प्रत्येक राजकीय पक्षाचा त्यांना मानणारा असा मतदार असतो. गेल्या काही निवडणुकांमध्ये मनसेच्या उमेदवारांना लाख लाख दीड लाख मते घेतल्याचे तुम्ही पाहिले असेलच. मनसेबाबत आमच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी तसेच काँग्रेसने वेगवेगळी मते मांडली आहेत. मात्र, असे असले तरी आगामी निवडणुकीत मोदी सरकारविरोधातील मतविभाजन टाळणे गरजेचे आहे. हे मतविभाजन टाळण्यासाठी सेक्युलर विचार मान्य असलेल्या समविचारी पक्षांनी एकत्र येणे आवश्यक आहे. त्यासाठी मनसेने आघाडीसोबत यावे असे मला वाटते.'' असे अजित पवार यांनी म्हटले होते. त्यानंतर, आता धनंजय मुडेंनीही लोकमतला दिलेल्या मुलाखतीत याबाबत आपले मत व्यक्त केले. 

'काका' विरोधात, 'पुतण्या'ची राज ठाकरेंना साद; पवार कुटुंबात मनसेवरून परस्परविरोधी मतं

मनसेला सोबत घेण्याबाबत माझही मत असंच आहे. जर समजा, दोन प्रमुख घटक पक्षांना एखाद्या पक्षामुळे अडचण असेल. भलेही त्या पक्षाची मते विभागली गेली का, मतं बाजूला झाली का? आणि काँग्रेस पक्षाची तशी अडचण असेल तर मनसेला सोबत घ्यावे का नाही, याबाबत विचार केलाच पाहिजे. पण, काँग्रेस पक्षाच्या संमतीनं, जर मतं विभागली जात नसतील तर, मनसेला सोबत घेण्यास काहीच अडचण नाही, असं माझही व्यक्तिगत मत आहे. मात्र, शेवटी हा निर्णय काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र बसून करण्याचा विषय आहे. आणि काँग्रेसची मर्जी राखून करण्याचा हा विषय आहे. राजू शेट्टींची नाराजी येत्या काळात निघेल, प्रकाश आंबेडकरांशीही बोलणं सुरू आहे, तेही या महाआघाडीत येतील, असा मला विश्वास असल्याचं धनंजय मुंडेंनी लोकमतशी बोलताना म्हटलं आहे.

पाहा व्हिडीओ - 

टॅग्स :राज ठाकरेमनसेधनंजय मुंडेकाँग्रेसनिवडणूक