Join us  

MNS : ... तर मी शिवसैनिकांना घुसून मारेन, मनसेच्या खोपकरांचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 26, 2022 4:50 PM

अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळी फटाके, मनसे, शिवसेना, युती आणि इतर मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली

मुंबई - दिवाळीतील फटाके उडवण्यावरुन नेहमीच वाद होत असतो. पर्यावरणवादी आणि काही सेलिब्रेटी दिवाळीच्या फटाक्यांवर आक्षेप घेत असतात. मात्र, फटाके उडविण्यास विरोध करणाऱ्यांना मनसेनं स्पष्ट शब्दात इशाराच दिला होता. मनसेचे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोपकर यांनी फटाक्यांना विरोध करणाऱ्यांना देश सोडून जाण्याचे म्हटले होते. त्यावरुन, काही जणांकडून त्यांना ट्रोल करण्यात आले. शिवसैनिकांनीही त्यांच्यावर पलटवार करताना टीका केली होती. मात्र, आता अमेय खोपकर यांनी टिकाकारांनाच इशारा दिला आहे. थेट मारण्याची भाषाच त्यांनी केली आहे. 

अमेय खोपकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन दिवाळी फटाके, मनसे, शिवसेना, युती आणि इतर मुद्द्यावर पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तरे दिली. मी माझ्या विधानावर ठाम आहे, असे म्हणत खोपकर यांनी फटाक्यांच्या ट्विटसंदर्भात स्पष्टीकरण दिलं. तसेच, मला शिव्या घालणारे लोकं शिवसेनेचे आहेत. जर माझ्या विधानावर खालच्या पातळीवत टीका केली तर मी घुसून मारेन, मी हा दम शिवसैनिकांना देत आहे. हिंदूंचा सण हा जोरात साजरा होणार, अशा शब्दात त्यांनी आपल्या ट्विटचं समर्थन करताना, शिवसैनिकांना सज्जड दमच भरला आहे. तसेच, किशोरी पेडणेकर यांना फटाका्यांचा आता त्रास होतो का? भोंग्यांचा त्रास त्यांना झाला नाही का?  या बेअक्कल लोकांनी शिवाजी पार्कवर जावं आणि जो सण साजरा करत आहोत तो पाहावा. हिंदूंची संस्कृती सगळ्यांना कळली पाहीजे, अशी टिकाही त्यांनी पेडणेकर यांच्यावर केली. 

किशोरी पेडणेकरांना एमआयएमसोबत युती करायची असेल, म्हणून त्यांची अशी टीका येत असेल. हिंदूंच्या सणाविरोधात जो बोलेल त्याच्या कानाखाली आम्ही आवाज काढू. हिंदूंच्या सणावेळेलाच प्रदूषण कसे दिसते, भोंग्यांचा त्रास कसा नाही होत? असा सवालही खोपकर यांनी विचारला आहे. 

फटाक्यांबाबत काय म्हणाले होते खोपकर

ज्या कुणाला फटाक्यांचा त्रास होत असेल त्यांनी बॅगा भरायच्या आणि लगेच मुंबई काय, देश सोडून निघून जायचं. अशा हिंदूद्वेष्ट्या मुसलमानांनी आमच्या देशात रहायची गरजच नाही. आमचा सण आहे, आम्ही फटाके वाजवणारच. आम्ही वर्षानुवर्षं भोंग्यांचा त्रास सहन करतोय ना,मग तुम्ही चार दिवस फटाके सहन करा, अशा शब्दात खोपकर यांनी दिवाळी फटाक्यांचा विरोध करणाऱ्या काही मुस्लीमांना थेट शब्दात सुनावले आहे.

मनसे-शिंदेगट युतीवरही बोलले

आमची मन जुळली आहे, पण युती होईल की नाही हे राज ठाकरे ठरवतील. कोविड काळात सगळ्या नाटकांचे निर्माते राज ठाकरेंना भेटायला आले होते, तेव्हा देखील शिंदे साहेबांना आम्ही भेटलो. जे जे लोकांसाठी करता येईल आणि एकत्र येणार असतील तर मग हरकत नाही. महाराष्ट्रात मराठी माणसाच्या हितासाठी काही लोकं जुळली तर चांगलंच आहे, असे खोपकर यांनी मनसे-शिंदे गटाच्या युतीवर म्हटले आहे. 

दरम्यान, दिवाळी हा आनंदाचा आणि दिव्यांनी प्रकाशमान होण्याचा सण. घरोघरो मोठ्या आनंदात दिवाळी साजरी केली जाते. गरीबाच्या झोपडीपासून ते गर्भश्रीमंतांच्या घरातही दिवे, लायटींग पाहायला मिळते. दिवाळी फराळ आणि गोडधोड पदार्थांची चव चाखायला मिळते. एकंदरीत सगळीकडे उत्साह आणि जल्लोष पाहायला मिळतो. त्यातच, फटाक्यांमुळे हा आनंद द्गविगुणीती होताना दिसून येतो. मात्र, दरवर्षीच फटाके वाजवण्यावरुन वाद-विवाद होत असतो.  

टॅग्स :मनसेशिवसेनादिवाळी 2022फटाकेकिशोरी पेडणेकर