मुंबई : राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठा भूकंप झाला असून अजित पवार आज मंत्री पदाची शपथ घेणार आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाराज असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार अचानक राजभवनात दाखल झाले आहेत. त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे अन्य काही नेते देखील उपस्थित आहेत. माहितीनुसार, अजित पवार महाराष्ट्राच्या सत्तेत सामील होणार असून, उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर टीका केली आहे.
"विश्व प्रवक्ते संजय राऊत यांनी करून दाखवले. नुसती सेना नाही तर राष्ट्रवादी पण फोडून दाखवली", अशा शब्दांत काळे यांनी संजय राऊत यांच्यावर बोचरी टीका केली.
विशेष म्हणजे, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राजभवनात दाखल झाले आहेत, तसेच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह भाजप आणि शिंदे गटाचे नेतेही राजभवनाच्या दिशेने निघाले आहेत. याशिवाय, भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते आधीपासूनच राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची तर राष्ट्रवादीचे इतर काही नेते मंत्रिपदाची शपथ घेणार असल्याची चर्चा आहे.