Join us

'आता नुसते टोमणे'; उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकपदाची धुरा स्वीकारल्यानंतर मनसेचा टोला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 5:23 PM

मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंना टोला लगावला आहे.

मुंबई- जून महिन्यामध्ये शिवसेनेत झालेल्या बंडाळीनंतर ४० हून अधिक आमदारा एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेल्याने शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. मुख्यमंत्रिपद गेल्यानंतर पक्षात झालेली बंडाळी मोडीत काढत पक्षाची पुनर्बांधणी करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सक्रियपणे पक्षकार्यास सुरुवात केली होती. दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी स्वीकारली आहे.

उद्धव ठाकरेंनी सामनाच्या संपादकपादाची जबाबदारी पुन्हा स्वीकारल्यानंतर मनसेने टोला लगावला आहे. "सामना"च्या मुख्य संपादकाची धुरा उद्धव ठाकरेंकडे...आता नुसते "टोमणे" हा सामना नाही...हा टोमणा, असं म्हणत मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी टोला लगावला आहे.

ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणारे दैनिक सामान हे शिवसेनेचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध आहे. शिवसेनेच्या महत्त्वाच्या भूमिका, निर्णय सामनामधून प्रसिद्ध होत असतात. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर सामनाचे संपादकपद उद्धव ठाकरे यांनी सांभाळले होते. मात्र २०१९ मध्ये राज्याच्या मुख्यमंत्रिपदी निवड झाल्यानंतर त्यांनी हे पद सोडले होते. त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी सामनाच्या संपादकपदाची जबाबदारी सांभाळली होती. मात्र शिवसेनेत बंडाळी होऊन महाविकास आघाडी सरकार  अल्पमतात आल्यानंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा दिला होता. 

दरम्यान, मुख्यमंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख म्हणून अधिक आक्रमक झाले होते. तसेच आता त्यांनी सामनाच्या संपादकपदाची धुराही आपल्या हाती घेतली आहे. आज प्रसिद्ध झालेल्या दैनिक सामनाच्या प्रेस लाईनमध्ये संपादक म्हणून उद्धव ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख आहे.  त्यामुळे पुढच्या काही दिवसांत सामनामधून शिवसेनेची आक्रमक भूमिका दिसण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :उद्धव ठाकरेमनसेशिवसेना