मुंबई- मी महाविकास आघाडीचा घटक आहे आणि राहीन. आगामी विधान परिषद निवडणुकीत याचा परिणाम होणार नाही. तसेच आम्हाला मुख्यंमत्री उद्धव ठाकरे भेटत नाही हे खरेच आहे, असं अपक्ष आमदार देवेंद्र भुयार म्हणाले. देवेंद्र भुयार यांनी शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी रविवारी भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी आपलं मत व्यक्त केलं.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले की, अपक्ष आमदारांची २० तारखेआधी भेट घ्या. त्यांची समजूत काढा. तसे मुख्यमंत्र्यांनी केले पाहिजे. आम्ही जनतेची कामे सांगतो, वैयक्तिक कामासाठी निधी मागत नाही, असेही भुयार यांनी म्हटले. देवेंद्र भुयार यांच्या या विधानानंतर मनसेचे प्रवक्ते गजानन काळे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे.
२ वर्षांनी मंत्रालयात येणाऱ्या मुख्यमंत्र्यांकडून वेगळी काय अपेक्षा करणार?, फेसबुक लाईव्हवरूनच कारभार सुरू आहे. महाराष्ट्राचा आणि म्हणे बेस्ट सीएम...मागे संजय राऊतांच्या मुखातून पवारसाहेब मुख्यमंत्री उगाच निघाले नव्हते, असा टोलाही गजानन काळे यांनी लगावला आहे.
दरम्यान, राज्यसभा निवडणुकीत शिवसेनेचे संजय पवार यांचा पराभव झाल्याने शिवसेना नेते संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली होती. राऊत यांनी काही अपक्ष आमदारांची नावे जाहीर करत, या आमदारांनी आम्हाला मतदान केलं नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यात देवेंद्र भुयार यांचंही नाव घेतलं होतं. त्यामुळे, देवेंद्र भुयार यांनी राग व्यक्त करत अगोदर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांची भेट घेतली. त्यानंतर, हॉटेल ग्रँड हयात येथे जाऊन संजय राऊत यांचीही भेट घेतली.