Join us

संजय निरुपम, रवींद्र वायकरांना लोकसभेची उमेदवारी देण्यास मनसेचा जोरदार विरोध

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 23, 2024 16:57 IST

मनसेच्या सरचिटणीस  शालिनी ठाकरे, मनसे नेते मनीष धुरी दोघांनीही केला जाहीर विरोध

मनोहर कुंभेजकर, मुंबई: मनसेनेसंजय निरुपम  यांच्यासह रवींद्र वायकर यांच्या संभाव्य उमेदवारीला विरोध केला आहे. मनसेच्या सरचिटणीस  शालिनी ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत निरुपम आणि वायकर यांना जाहीर विरोध केला आहे.

शालिनी ठाकरे यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत म्हंटले आहे की, "मनसेला 'धनुष्य बाण' चिन्हावर लढायला सांगणार्‍यावर दुसर्‍या पक्षातून उमेदवार आयात करण्याची नामुष्की ओढवली आहे. लक्षात ठेवा राजसाहेबांनी फक्त देशाला सक्षम नेतृत्व मिळावे यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठींबा दिला आहे.  इकडून तिकडून पाला पाचोळ्या सारखा उडत आलेला महाराष्ट्रद्रोही संजय निरुपम आणि भ्रष्टाचारी रविंद्र वायकर सारख्या उमेदवारांसाठी महाराष्ट्र सैनिकांचा पाठींबा गृहीत धरू नये".

शिंदे गट उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रविंद्र वायकर यांनी उमेदवारी देण्याची शक्यता असून ती जवळपास निश्चित झाली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रवींद्र वायकर यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याची माहिती आहे. वायकर इच्छुक नसल्याने मुख्यमंत्र्यांकडून मनधरणी सुरु असल्याचे समजते आहे. त्यातच संजय निरुपम हे शिंदे सेनेत प्रवेश करणार असून येथील उमेदवार म्हणून त्यांच्याही नावाचीही चर्चा सुरु आहे.निरुपम यांनी काही दिवसांपूर्वी उद्योग मंत्री उदय सामंत यांची भेट घेतली होती. पण यावरुन महायुतीला पाठिंबा देणारी मनसे नाराज आहे. 

या पोस्टवर प्रतिक्रिया देताना शालिनी ठाकरे यांनी सांगितले की,राज ठाकरेंना बिनशर्त पाठिंबा दिला आहे. पण काही जागांवरील जे उमेदवार समोर येत आहेत त्यांना मनसे कार्यकर्त्यांचा विरोध आहे. त्यांचा प्रचार कसा करायचा अशी विचारणा ते करत आहेत.  तुमच्याकडे उमेदवार नाहीत आणि आमच्या पक्षालाही पुढे येऊ देत नाही. त्या अनुषंगाने मी कार्यकर्त्यांची भूमिका मांडली आहे". संजय निरुपम यांच्यासारखे नेते महाराष्ट्रात विनाकारण वाद निर्माण करतात अशी टीकाही त्यांनी केली.

दरम्यान मनसे नेते मनीष धुरी यांनी देखिल सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत संजय निरुपम यांना विरोध केला आहे.ते म्हणाले की,संजय निरुपम हा महाराष्ट्रातील कचरा आहे.जेव्हा जेव्हा महाराष्ट्रात रेल्वे भरती,मराठी तरुणांना नोकऱ्या आणि इतर आंदोलने झाली तेव्हा ते आडवे गेले.मराठी तरुणांना खोटे गुन्हे,तडीपारी भोगायला लागली आहे.हा जेंव्हा सत्तेत होता तेंव्हा त्यांना माज होता.कोणत्या पक्षात प्रवेश करायचा हे त्या पक्षाचे धोरण व समर्थन असेल हे त्या त्या पक्षाने बघावे,पण आमचा त्याला जाहिर निषेध आणि विरोध असणार.आम्ही त्याला दाखवून देवू. जेव्हा राज ठाकरे उत्तर प्रदेशाला चालले होते,त्यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशच्या जनतेची माफी मागावी असे त्यांनी म्हंटले होते.हा पक्ष प्रवेश करणार असेल तर त्यांनी महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी,मगच त्याला पक्ष प्रवेश द्यावा असे त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :मनसेसंजय निरुपमरवींद्र वायकरराज ठाकरे